त्रिराज्य संकल्पना बाबासाहेबांनी मांडली होती
By Admin | Published: April 10, 2016 03:24 AM2016-04-10T03:24:55+5:302016-04-10T03:24:55+5:30
सध्या संसदेत राष्ट्रवाद, भाषा आणि वेगळ्या राज्यांच्या बाबतीत चर्चा होत आहेत. अनेक वादप्रवाद यानिमित्ताने होत आहेत.
गंगाधर पानतावणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान समारंभ
नागपूर : सध्या संसदेत राष्ट्रवाद, भाषा आणि वेगळ्या राज्यांच्या बाबतीत चर्चा होत आहेत. अनेक वादप्रवाद यानिमित्ताने होत आहेत. पण या बाबतीत बाबासाहेब हे एकमेव आदर्श आहेत. या संबंधातील बाबासाहेबांची मते समजून घ्यायला कुणीही तयार नाही आणि त्यांच्या नावाचाही उल्लेख होत नाही. लहान राज्यांसाठी बाबासाहेब स्वत: आग्रही होते. महाराष्ट्राच्या संदर्भात त्यांनी त्रिराज्य संकल्पना मांडली होती आणि त्याचे भाग कसे पाडावे, याचीही मते त्यांनी व्यक्त केली होती. महाराष्ट्राचे तीन राज्य करताना पूर्व, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्र अशी तीन राज्य करण्याची संकल्पना त्यांनी मांडली, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांनी व्यक्त केले.
आंबेडकराईट मुव्हमेन्ट आॅफ कल्चर अॅण्ड लिटरेचरतर्फे साहित्य, संस्कृतीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी पानतावणे बोलत होते. संस्थेतर्फे याप्रसंगी गंगाधर पानतावणे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत अशोक गोडघाटे तर प्रमुख अतिथी म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम, कृष्णा किरवले, प्रकाश खरात, प्रकाश त्रिभुवन, डॉ. महेंद्र भवरे, सुजाता लोखंडे उपस्थित होते. हा कार्यक्रम विदर्भ सांस्कृतिक संघाच्या सांस्कृृतिक संकुलातील चौथ्या माळ्यावरील सभागृहात पार पडला. पानतावणे म्हणाले, राष्ट्रभाषा कुठली असावी हा वाद संसदेत झाला तेव्हा प्रत्येकाने संस्कृतपासून आपापल्या मातृभाषेचे महत्त्व समजून सांगितले. त्यावेळी बाबासाहेबांनी मराठीचा पुरस्कार केला पण राष्ट्रभाषा सर्व देशाला जोडणारी असावी. त्यामुळे हिंदीच राष्ट्रभाषा असावी, असा आग्रह धरला होता. बाबासाहेब द्रष्टे होते. ते स्वयंप्रज्ञ होते. आम्हा सर्वांसाठी ते एकमेव आदर्श आहेत. पण आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाला इतर तत्त्वज्ञानाचे ठिगळ लावण्याचा प्रयत्न करणारी मंडळी त्यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करतात. बाबासाहेब असल्या अनेक वादळातही स्थिर राहणारे आहेत. या पुरस्काराने माझ्यावरील जबाबदारी वाढली, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
प्रस्तावना आणि भूमिका संस्थेचे दादाकांत धनविजय यांनी मांडली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. मच्छिंद्र चोरमारे यांनी तर गंगाधर पानतावणे यांच्या सन्मानपत्राचे वाचन पल्लवी जीवनतारे यांनी केले. याप्रसंगी पानतावणे यांना दहा हजार रुपये रोख, शाल, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार डॉ. गंगाधर पानतावणे (दहा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र). हा कार्यक्रमासाठी भूपेश थुलकर, महेंद्र गायकवाड, सुरेश वर्धे, डॉ. सविता कांबळे, राजन वाघमारे, अशोक मेश्राम, गौरव थूल परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)