कोरोना व्हायरसच्या म्युटेशनमुळे वाढली चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2022 07:47 PM2022-12-24T19:47:00+5:302022-12-24T19:47:42+5:30
Nagpur News म्युटेशनदरम्यान व्हायरस अपेक्षेपेक्षा वेगळ्या पद्धतीने वर्तन करू शकतो. यामुळे लसीकरण, जिनोमिक चाचणी आणि चौथा बूस्टर डोस ही काळाची गरज आहे.
नागपूरः कोरोना विषाणूच्या उत्परिवर्तनामुळे (म्युटेशन) चिंता वाढली आहे. कोणतीही नवीन महामारी आपल्यासोबत विषाणूचे म्युटेशन घेऊन येते. म्युटेशनदरम्यान व्हायरस अपेक्षेपेक्षा वेगळ्या पद्धतीने वर्तन करू शकतो. यामुळे लसीकरण, जिनोमिक चाचणी आणि चौथा बूस्टर डोस ही काळाची गरज आहे.
-व्हायरसचे वर्तन बदलणे म्हणजे काय?
व्हायरसची संख्या वाढल्यास ते आपल्या वर्तनातही बदल करतात. ज्या व्हायरसमध्ये आनुवंशिक स्वरुपात ‘आरएनए’ असतो, जसे ‘सार्स सीओव्ही-२’ व्हायरसमुळे कोविड होतो, इन्फ्लुएंझा व्हायरस ‘डीएनए’ असणाऱ्या व्हायरसच्या तुलनेत वेगाने म्युटेट होतो. प्रत्येकवेळी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला की त्याच्या वर्तनातही बदल होण्याची शक्यता असते. सुदैवाने व्हायरसमधील मुख्य प्रथिने बदलत नाहीत.
-जीनोमिक सिक्वेन्सिंग म्हणजे काय?
जीवाणू किंवा विषाणूमध्ये आढळून येणारी आनुवांशिकता समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञ ‘जिनोमिक सिक्वेन्सिंग’चा वापर करतात. यामुळे विषाणू कसा बदलत आहे व त्याचा कसा प्रसार होईल हे समजण्यास मदत होते. लोकसंख्येत विशिष्ट व्हेरिएंटचा प्रसाराचा अंदाज लावण्यासोबतच ‘मोनोक्लोनल अँटिबॉडीज’सारखे वैद्यकीय उपचार व्हेरिएंटच्या विरोधात किती प्रभावी आहेत, याचेही जिनोमिक सिक्वेन्सिंगमध्ये मूल्यांकन करता येते.
-उत्परिवर्तन म्हणजे काय?
उत्परिवर्तन म्हणजे, व्हायरसच्या जेनेटिक कोडमध्ये एकल परिवर्तन. हे वारंवार होत असते; परंतु यात कधीकधी विषाणूचे गुणधर्म बदलतात.
-भारताला वाचवण्यासाठी काय करता येईल?
कोरोना व्हायरस संसर्ग असलेल्या लोकांना ओळखणे, जीनोमिक सिक्वेंसमधून व्हायरसची ओळख करणे, रुग्णाचा प्रवास इतिहास लक्षात घेणे, ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांचे लसीकरण करणे, पात्र लोकांना बूस्टर देणे आदी आवश्यक आहे.
-इतर सुरक्षा उपाय?
मास्क घालणे, सामाजिक अंतर राखणे आणि हँड सॅनिटायझर वापरणे महत्त्वाचे असू शकते. यामध्ये, कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांनी विशेषत: वृद्ध, उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, दमा किंवा सीओपीडी किंवा घातक रोग असलेल्या लोकांनी मास्क घालावे.
-महामारीपासून आपण कोणते धडे घेतले आहेत?
या रोगाला कोणत्याही परिस्थितीत रोखणे, लसीकरण आणि वैयक्तिक खबरदारी घेणे, शिफारशींनुसार लस घेऊन कोविड संसर्गाची तीव्रता कमी करणे, ६० वर्षांवरील लोकांनी कोणत्याही परिस्थितीत जास्त सावध रहाण्याचे धडे आपण महामारीतून घेतले आहेत.
-उपचाराचा अनुभव कसा होता?
रेमडेसिवीरसह विषाणूविरोधी औषधे अगदी सुरुवातीच्या टप्प्यात प्रभावी असल्याचे आढळून आले. स्टिरॉइड्स फक्त निवडक प्रकरणांमध्येच देणे आवश्यक आहे. कारण, कोरोनाच्या पहिल्या महामारीमध्ये मधुमेह आणि ऑस्टिओपोरोसिसच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती. महामारीच्या सुरुवातीला असे अनेक आकस्मिक मृत्यू झाले ज्यांचे कारण स्पष्ट झालेले नाहीत. वैद्यकीय व्यवसायासाठी हे मोठे आव्हान ठरले आहे. रोगानंतरच्या गुंतागुंतांमध्ये अचानक हृदयविकाराचा झटका आणि थ्रोम्बोसिस, अर्धांगवायू आणि मेंदूत रक्तस्त्राव आणि गँग्रीन सारखे आजार दिसून आले. कोरोना व्हायरस संसर्गानंतर ‘हेपरिन’चा उपयोग आणि रक्त पातळ करण्यासाठी अॅस्पिरिन वापरण्याची शिफारस केली जाते.