खतटंचाईची नव्हे, दरवाढीची चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:08 AM2021-05-22T04:08:46+5:302021-05-22T04:08:46+5:30
उमरेड : रासायनिक खतांची दरवाढ होताच सर्व स्तरातून संतापाची लाट उसळली. शासनाला दरवाढीवर फेरविचार करावा लागला. दोन-चार दिवसात दरवाढीचा ...
उमरेड : रासायनिक खतांची दरवाढ होताच सर्व स्तरातून संतापाची लाट उसळली. शासनाला दरवाढीवर फेरविचार करावा लागला. दोन-चार दिवसात दरवाढीचा निकाल लागेल. पाचशे-हजार वाढवायचे व दोन-चारशे रुपये कमी करायचे असे खताबाबत होऊ नये, अशा रोखठोक प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या आहेत. दरवर्षी खतटंचाईला सामोरे जावे लागते. विशेषत: युरियाच्या बाबतीत हे घडते. असे असले तरी यंदा बळीराजाला खतटंचाईची नव्हे तर दरवाढीची चिंता सतावित आहे. दरवाढ कमी होताच रासायनिक खतांच्या खरेदीवर उड्या पडतील. सध्या नागपूर जिल्ह्यासाठी एक लाख ९४ हजार १०० मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली आहे. गतवर्षी कोरोनाच्या काळात युरियाची समस्या उद्भवली होती. एकरी एक ते दीड बॅग युरिया पुरेसे असताना साठेबाजीमुळे तुटवडा निर्माण होतो. पिकांची झटपट वाढ, पिके हिरवेकंच बहरून येत असल्याच्या गुणधर्मामुळे सोबतच अल्पकिंमत असल्यानेच शेतकरी अधिकांश प्रमाणात युरिया घेतात. यंदा खरीप हंगामासाठी ५९,५०० मे.टन युरियाची मागणी नोंदविण्यात आली असून, ४७,०६० मे. टन मंजुरी मिळाली. सध्या जिल्ह्यात १६,११० मे. टन युरिया उपलब्ध आहे. टप्याटप्याने नियमित सप्टेंबरअखेरपर्यंत सर्वच रासायनिक खतांचा पुरवठा होणार आहे. संयुक्त खत म्हणून उपयोगी ठरत असलेल्या एनपीके खतालासुद्धा चांगली मागणी असते. त्यामुळे ५३,९०० मे.टन एनपीकेची मागणी तर ३६,१०० मे.टन आवंटन मंजूर झाले आहे.
सोयाबीन व कपाशी पिकांवर वापर होणाऱ्या डीएपीची मागणी २९,१०० मे.टन तर त्यापैकी २६,१९० मे.टन मंजुरी मिळाली आहे. मुख्यत: भात पिकांसाठी वापरल्या जाणाऱ्या एमओपी खतांची ९,८०० मे. टन मागणी होती. पैकी ४,९०० मे.टन मंजुरी मिळाली. सोयाबीन पिकांसाठी वापरण्यात येणारे एसएसपी या दाणेदार खताचाही वापर चांगला होतो. ४१,८०० मे. टन मागणी केल्यानंतर ३०,७३० मे. टन मंजूर करण्यात आले आहे. जमिनीची पोत सुधारण्यासाठी कंपोस्ट खताचा वापर केला जातो. फारसा वापर नसल्याने आणि सध्या ४.६० मे. टन साठा उपलब्ध असल्याने यंदा कंपोस्ट खताची मागणी केली गेली नाही. सर्वदूर, समप्रमाणात असा वितरणाचा मूलमंत्र संपूर्ण यंत्रणा राबविणार असून, खत भरपूर आहे. हवे तेवढेच मागा, असे आवाहन केले जात आहे.
विशेष लक्ष राहणार
एकूणच नागपूर जिल्ह्यासाठी एक लाख ६० हजार मे.टनच्या आसपास रासायनिक खत पुरेसे आहे. कोरोनाच्या संकटकाळात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये. फसवणूक, अडवणूक होणार नाही शिवाय युरियाची साठेबाजी होऊ नये याची विशेष काळजी घेतली जात आहे. एक लाख ९४ हजार १०० मे.टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली असून, एक लाख ४४,९८० मे. टन आवंटन मंजूर झाले आहे. १ एप्रिलपासून ८२,४४९ मे. टन खतांचा साठा उपलब्ध आहे. १ एप्रिलपासून खतांची विक्री केवळ ८,३५९ मे.टन तर आजमितीस ७४,०९० मे. टन रासायनिक खते शिल्लक आहे.
-
युरिया पोहोचता झाला
यंदाच्या खरीप हंगामासाठी आतापर्यंत युरियाच्या चार वेगवेगळ्या खेप आल्या. ३० मार्च, १४ आणि १७ एप्रिल तसेच ६ मे रोजी एकूण ७,९५० मे. टन युरिया आला. यामध्ये नर्मदा कंपनीचा १,४०० मे. टन, तर अन्य आरसीएफ कंपनीचा युरिया नागपूरला पोहोचता झाला आहे.
---
बियाणे, खते व औषधांच्या वाढलेल्या किमतीमुळे शेती न केलेली बरी, असे आम्हास वाटते. शेतकऱ्यांनी शेतीच करू नये. गुलाम बनविण्यासाठी उचललेले हे पाऊल आहे. वाढीव दर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारे आहे. सिलिंडर, पेट्रोल, डिझेलच्या मोठ्या दरवाढीनंतर थोडे कमी करणे अशी धोकेबाजी शासनाने शेतकऱ्यांसोबत करू नये.
- विलास दरणे, शेतकरी, उदासा, ता. उमरेड