नागपुरात सदाबहार गीतांनी सजली ‘बिनाका गीतमाला’ ची मैफिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 11:38 PM2019-05-30T23:38:49+5:302019-05-30T23:40:34+5:30
हिंदी सिनेमा संगीताच्या सुवर्ण काळातील सदाबहार गाणी आजही मनाला प्रसन्न करतात. रेडिओवर प्रसारित होणारा ‘बिनाका गीतमाला’ हा कार्यक्रम अशा कर्णमधूर गीतांना रसिकांपर्यंत पोहचविण्याचे प्रभावी माध्यम ठरले होते. त्या सुवर्ण काळातील आठवणी ताज्या करणाऱ्या बिनाका गीतमाला या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले. लोकमत सखी मंच आणि हार्मोनी इंटेरियर्स यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिंदी सिनेमा संगीताच्या सुवर्ण काळातील सदाबहार गाणी आजही मनाला प्रसन्न करतात. रेडिओवर प्रसारित होणारा ‘बिनाका गीतमाला’ हा कार्यक्रम अशा कर्णमधूर गीतांना रसिकांपर्यंत पोहचविण्याचे प्रभावी माध्यम ठरले होते. त्या सुवर्ण काळातील आठवणी ताज्या करणाऱ्या बिनाका गीतमाला या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले.
लोकमत सखी मंच आणि हार्मोनी इंटेरियर्स यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी हार्मोनी इंटेरियर्सच्या ऑनर नेहा पटेल व मेट्रोचे सहायक अभियंता गजानन निशानकर प्रामुख्याने उपस्थित होते. लोकमतचे इव्हेंट मॅनेजर आतिश वानखेडे यांनी अतिथींचा सत्कार केला. यावेळी नेहा पटेल यांनी प्रेझेंटेशन दिले. १९५३ ते १९८५ या काळातील चित्रपटांची गाणी सहभागी गायकांनी सुमधूर आवाजाने सादर केली तेव्हा श्रोते मंत्रमुग्ध झाले. किशोरदा, रफी, मुकेश, आशा भोसले व लता मंगेशकर अशा दिग्गज गायकांची गाणी या मैफिलीत सजली. कार्यक्रम पाहण्यासाठी सिव्हील लाईन्सचे वसंतराव देशपांडे सभागृह श्रोत्यांच्या गर्दीने फुलले होते.
व्हॉईस ऑफ रफी म्हणून परिचित ज्योतिरामण अय्यर, व्हॉईस ऑफ किशोर म्हणून ओळख असलेले सागर मधुमटके तर अरविंद पाटील यांनी मुकेशच्या गीतांना स्वरसाज चढविला. यांच्यासह गुणी गायिका आकांक्षा नगरकर, श्रेया खराबे यांच्या स्वरांनीही श्रोत्यांना भुरळ पाडली. संगीत संयोजन राजेश समर्थ यांनी केले. प्रास्ताविक नेहा जोशी यांनी केले. शुभांगी रायलु यांनी संचालन केले.
आगाज से अंजाम तक ‘वाह-वाह’
लोकमतच्या व्हिडीओ क्लीपने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर श्रेया खराबे या गायिकेने ‘ये जिंदगी उसी की...’ या गीताने मैफिलीचा आगाज केला. पुढे ‘मेरा जूता है जापानी...’ सादर करून अरविंद पाटील यांनी टाळ्या घेतल्या. सुमधूर आवाज लाभलेले व्हॉईस ऑफ रफी ज्योतिरामण अय्यर यांनी श्रेयासह ‘ऐ दिल है मुश्किल...’ या युगुल गीताने समा बांधला. यानंतर अय्यर यांनी ‘जिंदगी भर नही...’, ‘तेरी प्यारी-प्यारी...’ ‘एहसान तेरा होगा...’, ‘बहारों फूल बरसाओ...’ अशा कर्णमधूर गीतांनी श्रोत्यांना झुमायला मजबूर केले. पुढे अय्यर यांनी आकांक्षा नगरकरसह ‘जो वादा किया वो...’ आणि ‘डफलीवाने डफली बजा...’ ही गाणी सादर केली.
दुसरीकडे व्हॉईस ऑफ किशोर म्हणून परिचित सागर मधुमटके यांनी नेहमीच्या अंदाजात आकांक्षासमवेत ‘हाल कैसा है जनाब का...’ आणि श्रेयासोबत ‘अंग्रेजी में कहते हैं की...’ असे मस्तीभरे युगलगीत सादर केले. किशोर दा यांचा मस्तीभरा अंदाज सागर यांनी ‘खईके पान बनारस वाला...’ या गीतामधून दर्शविला. या गायक कलावंतांनी एकाहून एक सरस गाणी सादर करीत श्रोत्यांना मनसोक्त आनंद दिला. ‘शायद मेरी शादी का खयाल...’ या गीतासह आकांक्षा, सागर व संगीता सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाला सुंदर शेवटापर्यंत पोहचविले. रसभरीत गीतांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रोत्यांना खिळवून ठेवले.