मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागासाठी शेतकऱ्यांना सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 09:15 PM2017-11-22T21:15:53+5:302017-11-22T21:24:06+5:30
मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देत ऊर्जामंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी ३० हजाराची थकबाकी असल्यास सुरुवातीला ३ हजार व ३० हजारापेक्षा अधिक थकबाकी असल्यास ५ हजार रुपये भरण्याची सवलत बुधवारी जाहीर केली आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देत ऊर्जामंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी ३० हजाराची थकबाकी असल्यास सुरुवातीला ३ हजार व ३० हजारापेक्षा अधिक थकबाकी असल्यास ५ हजार रुपये भरण्याची सवलत बुधवारी जाहीर केली आहे. ही रक्कम ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत भरावयाची आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना वीजदेयकाची दुरुस्ती करावयाची आहे. त्यांच्यासाठी प्रत्येक फिडरनिहाय वीजदेयक दुरुस्ती शिबिराचे आयोजन १ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०१७ या कालावधीत महावितरणतर्फे करण्यात येणार आहे.
मुंबईत महावितरणचे मुख्यालय प्रकाशगड येथे बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत ऊर्जा सचिव अरविंद सिंह, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार व महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे उपस्थित होते. ज्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा वीजबिलांचा भरणा न केल्यामुळे खंडित करण्यात आलेला आहे अशा शेतकऱ्यांनी पैसे भरताच त्यांचा वीजपुरवठा तात्काळ जोडण्यात येणार आहे. मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होणाºया ज्या शेतकऱ्यांना आपली देयके वाढून आली आहेत असे वाटत असेल त्यांनी फिडरनिहाय आयोजित शिबिरात सहभाग घेऊन आपली देयके तपासून घ्यावीत, असे आवाहन महावितरणने केले आहे.
कृषीपंपांना थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना २०१७ ची घोषणा ३० आॅक्टोबर २०१७ ला ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी जाहीर केली होती. या योजनेची मुदत ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत असून या योजनेत सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होऊन महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहनही ऊर्जामंत्र्यांनी केले आहे.