२७ चिमुकल्यांवर कॉक्लीअर इम्प्लांट : राज्यात शासकीय रुग्णालयात मेयो आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 12:30 AM2019-06-02T00:30:09+5:302019-06-02T00:31:02+5:30
जन्मजात श्रवणदोषावर ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ हा अद्ययावत पर्याय आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) ‘कान, नाक, घसा (ईएनटी) विभागाने शनिवारी चार बालकांवर ही शस्त्रक्रिया झाली. १ जुलै रोजी पुन्हा सहा बालकांवर ही शस्त्रक्रिया होऊन ‘इम्प्लांट’चा २७ वा आकडा गाठला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जन्मजात श्रवणदोषावर ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ हा अद्ययावत पर्याय आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) ‘कान, नाक, घसा (ईएनटी) विभागाने शनिवारी चार बालकांवर ही शस्त्रक्रिया झाली. १ जुलै रोजी पुन्हा सहा बालकांवर ही शस्त्रक्रिया होऊन ‘इम्प्लांट’चा २७ वा आकडा गाठला जाणार आहे. एवढ्या मोठ्या संख्येत ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ करून मूकबधिरता दूर करणारे राज्यातील हे पहिले रुग्णालय ठरले आहे.
ज्या चिमुकल्यांना जन्मापासून ऐकू येत नव्हते. श्रवणदोष असल्याने त्यांनी जगातला कोणताच आवाज ऐकला नव्हता. पैसे नसल्याने महागडे ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ खरेदी करणेही शक्य नव्हते. अशांसाठी मेयोचे ‘ईएनटी’ विभागातील ‘कॉक्लीअर इम्प्लांट केंद्र’ आधार ठरत आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांच्या मार्गदर्शनात विभागाचे प्रमुख डॉ. जीवन वेदी यांच्या पुढाकारामुळे कॉक्लीअर इम्प्लांट केंद्राला २०१७ मध्ये सुरुवात झाली. विदर्भातील एकमेव शासकीय रुग्णालयात सुरू झालेल्या या केंद्राचा फायदा गरजूंना होऊ लागला आहे. सुरुवातीला चार रुग्णांवर यशस्वी ‘इम्प्लांट’ केल्यानंतर पुढे हा आकडा वाढतच गेला. शनिवार १ जून रोजी पुन्हा चार बालकांवर हे ‘इम्प्लांट’ करण्यात आल्याने हा आकडा २१ वर पोहचला आहे. पद्मश्री डॉ. मिलिंद कीर्तने यांच्या देखरेखीखाली झालेल्या सर्वच शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. या शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना ‘स्पीच थेरपी’ देऊन त्यांना बोलतेही केले जात आहे.
श्रवण चाचणीची पहिली ओपीडी
मेयोच्या ईएनटी विभागाचे प्रमुख डॉ. वेदी यांनी पहिली श्रवण चाचणी ओपीडी सुरू केली आहे. यामुळे मेयो रुग्णालयात जन्म घेतलेल्या बालकांची श्रवण चाचणी करून दोष आढळल्यास त्याला उपचाराखाली आणले जात आहे. शासकीय रुग्णालयांमध्येही हा पहिलाच उपक्रम आहे. डॉ. वेदी यांच्यानुसार, जन्मजात बहिरेपणाचे निदान होऊन ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ शस्त्रक्रिया झाल्यास श्रवणदोष दूर करण्याचा यशाचा टक्का वाढतो. यामुळे ही ओपीडी श्रवणदोष दूर करणारे एक माध्यम ठरत आहे.
१५ बालकांना शस्त्रक्रियेची प्रतीक्षा
डॉ. वेदी म्हणाले, श्रवणदोष दूर करणारे हे केंद्र कमी वेळात प्रसिद्धीस आले आहे. यामुळे दिवसेंदिवस श्रवणदोषाच्या रुग्णांत वाढ होऊ लागली आहे. ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ हे महागडे यंत्र आहे. यामुळे गरजू रुग्णांना निवडून त्यावर ही शस्त्रक्रिया केली जात आहे. सध्याच्या स्थितीत १५ बालके या शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत.