नऊ ठरावांसह नागपुरातील अक्षर साहित्य संमेलनाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 11:40 PM2018-11-24T23:40:50+5:302018-11-24T23:42:27+5:30
साहित्य ही निरंतर निर्माण होणारी प्रक्रिया आहे. समाजात सातत्याने साहित्याचे सृजन होत असते. या सृजनाची निर्मिती करणारे लेखक, कवी, कथाकारांची लोक उपेक्षा करतात, मात्र ते चिरकाळ टिकणारे असते. अशा नवोदितांचे साहित्य चांगले की वाईट याची चिकित्सा होणे, त्यांच्या सृजनाचे मूल्यमापन होणे आवश्यक आहे. या नवसृजनाच्या मूल्यमापनासाठी साहित्य संमेलन आवश्यक असल्याचे मत ज्येष्ठ समीक्षक डॉ. प्रज्ञा आपटे यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : साहित्य ही निरंतर निर्माण होणारी प्रक्रिया आहे. समाजात सातत्याने साहित्याचे सृजन होत असते. या सृजनाची निर्मिती करणारे लेखक, कवी, कथाकारांची लोक उपेक्षा करतात, मात्र ते चिरकाळ टिकणारे असते. अशा नवोदितांचे साहित्य चांगले की वाईट याची चिकित्सा होणे, त्यांच्या सृजनाचे मूल्यमापन होणे आवश्यक आहे. या नवसृजनाच्या मूल्यमापनासाठी साहित्य संमेलन आवश्यक असल्याचे मत ज्येष्ठ समीक्षक डॉ. प्रज्ञा आपटे यांनी व्यक्त केले.
साहित्य विहार संस्थेच्यावतीने आयोजित अक्षर साहित्य संमेलनाच्या सांगता प्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी ज्येष्ठ लेखिका आशा बगे, संस्थेच्या अध्यक्षा आशा पांडे प्रामुख्याने उपस्थित होत्या. डॉ. आपटे यांनी संमेलनाच्या फलश्रुतीवर आपले विचार मांडले. साहित्यिक एकांतात लिहीत असले तरी ते लोकांतात पोहचावे, त्याला दाद मिळावी, ही त्यांची अपेक्षा असते. या सृजनशीलतेची गजबज संमेलनातून होते. अनेक नवोदित कवी, कथाकार, लेखक आहेत, ज्यांना मोठ्या संमेलनात संधी मिळत नाही. अशा नवोदितांना रसिकांची साद घालता यावी, यासाठी असे लहानमोठी संमेलने आवश्यक आहेत. मोठमोठ्या साहित्य संमेलनात महिलांना फार स्थान मिळाले नाही. अशा संमेलनातून ते मिळावे, ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तज्ज्ञ साहित्यिकांचे मार्गदर्शन नवोदितांना मिळावे, कथेमागची कथा शिकण्याचे तंत्र शिकता यावे, ब्लॉग तसेच नवनवीन माध्यमांवर लेखनाचे तंत्र समजावे, अशा सर्व गोष्टींचा उहापोह संमेलनातून होणे गरजेचे आहे. रचनाकार आणि वाचकही विकृत, खलनायकी साहित्याकडे वळू नये आणि आनंद देणारे साहित्य समाजाच्या हिताचेही असावे, यासाठी सृजनशील साहित्याला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. यासाठी संमेलनाची भूमिका महत्त्वाची आहे. एकूणच संमेलन म्हणजे सुसंस्कृतपणाकडे नेणाऱ्या वाङ्मयीन संस्कृतीच्या बीजारोपणाची प्रक्रिया होय, असे मनोगत डॉ. आपटे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन शालिनी कुकडे यांनी केले.
हे ठराव झाले पारित
मराठीच्या अभ्यासाच्या सुविधेसाठी मराठी अभ्यास केंद्राची निर्मिती करावी, मराठी शाळांनी या भाषेची आवड निर्माण करण्यासाठी बाल साहित्य संमेलनासारखे उपक्रम व विविध स्पर्धा घ्याव्या, घराघरात मराठीची सुभाषिते व विचार संग्रह वितरित व्हावे, ग्रामीण मराठीचे प्रमाण भाषेत अनुवाद करून जोडणी करावी जेणेकरून समता व समरसता साधेल, लेखन, वाचन संस्कृतीच्या विकासासाठी नवोदितांना प्रोत्साहन देणाऱ्या संस्थांना शासकीय मदत मिळावी, सर्व प्राथमिक शाळांत मराठी भाषेचे शिक्षण अनिवार्य व्हावे, शासकीय संस्थांप्रमाणे खासगी संस्था व बँकांच्या व्यवहारात मराठी भाषा अनिवार्य करावी, मराठी भाषेला प्रोत्साहन देणाऱ्या संस्थांना अनुदान व अशा संस्था स्थापण्याच्या अटी शिथिल कराव्यात, खासगी संस्थांकडून मदतीसाठी प्रयत्न व्हावे, असे ठराव या संमेलनात पारित करण्यात आले. हे ठराव लवकरच राज्य शासन तसेच साहित्य व संस्कृती मंडळाकडे पाठविण्यात येणार असल्याचे डॉ. विनोद अलोणी यांनी यावेळी सांगितले.
यांचा झाला सत्कार
संमेलनादरम्यान लेखक शामाकांत कुळकर्णी, अरुणा सबाने, कुसुमताई कमलाकर, विजय फणशीकर, लक्ष्मण लोखंडे, डॉ. संजय वाघ, अॅड. भानुदास कुळकर्णी, चंद्रकांत चन्ने, बाबा देशपांडे, विष्णू मनोहर, शिशिर पारखी, वंदना मुजुमदार, डॉ. मनीषा यमसनवार, सुजाता लोखंडे, वृंदा काठे, अंश रंदे, आशा बगे, वि.स. जोग आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
मराठीही अर्थव्यवस्थेशी जोडली जावी
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ‘मराठी शाळांची रोडावणारी पटसंख्या’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी वक्ता म्हणून प्रा. मदन ढोले, नीता वर्णेकर, मृणालिनी वाघमारे यांनी मराठीकडे दुर्लक्ष होण्याची विविध कारणे विशद केली. अध्यक्षस्थानी असलेले डॉ. कुमार शास्त्री यांनी रोजगारासाठी, अर्थव्यवस्थेसाठी इंग्रजीचा वापर होत असल्याने मराठीकडे दुर्लक्ष होत असल्याचे मत व्यक्त केले. यामुळे अर्थव्यवस्थेशी मराठी जोडली जाण्याची गरज असल्याचे मनोगत व्यक्त केले. संमेलनाच्या दुसºया सत्रात ज्येष्ठ साहित्यिक शुभांगी भडभडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेण्यात आला.