थोरल्याच्या वरातीआधीच धाकट्याची अंत्ययात्रा
By admin | Published: November 5, 2016 03:04 AM2016-11-05T03:04:53+5:302016-11-05T03:04:53+5:30
ते दोघे तसे सख्खे भाऊ, पण जीवाभावाचे मित्र. लहानपणापासून अगदी मित्रासारखेच जगले.
नियतीचा अजब खेळ : भगत कुटुंबाचा आनंदसोहळा दु:खात बदलला
नागपूर : ते दोघे तसे सख्खे भाऊ, पण जीवाभावाचे मित्र. लहानपणापासून अगदी मित्रासारखेच जगले. लहानाचे मोठे झाले. मोठ्याचे नुकतेच लग्न जुळले. शनिवारचा लग्नसोहळाही ठरला. मोठ्या भावाच्या लग्नात काही कमी होऊ नये म्हणून लहान भावाने नियोजनाची सर्व जबाबदारी आपल्या अंगावर घेतली.
मोठ्या उत्साहाने तो सर्व कामात लक्ष देत होता. लग्नघटिका आता काही तासांवर आली असताना नियतीने अचानक डाव साधला अन् मोठ्या भावाची वरात निघण्याआधीच हृदयविकाराने जीव गमावणाऱ्या लहान्याची अंत्ययात्रा काढावी लागली. हृदय हेलावून टाकणारा हा प्रसंग आज शुक्रवारी प्रभात कॉलनी नारा रोड येथील भगत कुटुंबावर गुदरला. मिलिंद भगत हे उत्तर नागपुरातील प्रभात कॉलनी नारा रोड येथे राहतात.
ते निमखेड तारसा येथे बँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक आहेत. त्यांच्या पत्नी अॅड. रजनी भगत या जिल्हा न्यायालयात प्रॅक्टीस करतात. त्यांना चैतन्य व कुणाल ही दोन मुलं आहेत. मोठा चैतन्य राष्ट्रीय बँकेत अधिकारी आहे तर लहान कुणाल (२७) हा एमबीए करीत आहे. चौघांचे हे सुखी कुटुंब आहे. यातच चैतन्यचे स्नेहा नावाच्या मुलीशी लग्न ठरले. ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता सातपुडा लॉन येथे लग्नसमारंभ आयोजित करण्यात आला होता. घरातील पहिलेच लग्न असल्याने मोठ्या थाटात हे लग्न करण्याची घरच्यांची योजना होती. लहान मुलगा कुणाल यात सर्वात पुढे होता. संपूर्ण आयोजनाची तयारी तो स्वत: पाहत होता. भावाचे लग्न असल्याने त्याचा कामाचा उत्साह सुद्धा ओसंडून वाहत होता. नातलग मंडळीही घरी पोहोचली होती. शुक्रवारी दुपारी ४.३० वाजता घरी परित्राण पाठ (पूजा) आयोजित करण्यात आली होती. परित्राण पाठमध्ये घरातील सर्वच मंडळी बसली होती. अचानक कुणालच्या छातीत कळ आली. काही कळायचा आत तो खाली कोसळला. त्याला लगेच एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. काही वेळापूर्वी आनंदात असलेल्या भगत कुटुंबावर एकदम शोककळा पसरली. त्याचा मृतदेह घरी आणण्यात आला तेव्हा भगत कुटुंबच नव्हे तर परिसरातील नागरिकांनाही अश्रू आवरणे कठीण झाले होते. अशा शोकाकूल वातावरणात कुणालवर सायंकाळी वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.