सुरेंद्र गडलिंग यांच्यावरील कारवाईचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:39 AM2018-04-20T00:39:47+5:302018-04-20T00:39:58+5:30
अॅड. सुरेंद्र गडलिंग यांच्यावर पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी वकिलांच्या विविध संघटनांतर्फे गुरुवारी जिल्हा न्यायालयापुढे आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अॅड. सुरेंद्र गडलिंग यांच्यावर पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी वकिलांच्या विविध संघटनांतर्फे गुरुवारी जिल्हा न्यायालयापुढे आंदोलन करण्यात आले.
आंदोलकांनी सरकारविरुद्ध घोषणा देऊन पोलिसांना निलंबित करण्याची व संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी केली. भीमा-कोरेगाव येथे दंगल घडवून आणणाऱ्या आरोपींना वाचविण्यासाठी सरकारने काही सामाजिक कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचा कट रचला. त्यात अॅड. गडलिंग यांचाही समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्या घराची बेकायदेशीररीत्या तपासणी करून विविध साहित्य जप्त केले. ही कारवाई अन्यायकारक आहे. गडलिंग यांना सर्व साहित्य परत करून सरकार व पोलिसांनी त्यांची माफी मागावी, असे आंदोलकांनी सांगितले.
डेमोक्रेटिक अॅडव्होकेट असोसिएशन फॉर कॉन्स्टिट्युशनल अॅक्शन, आॅल इंडिया लॉयर्स युनियन, इंडियन असोसिएशन आॅफ लॉयर्स, कास्ट्राईब लॉयर्स असोसिएशन व डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात अॅड. प्रकाश जयस्वाल, अॅड. संदीप नंदेश्वर, अॅड. अनिल काळे, अॅड. सुरेश घाटे, अॅड. अक्षय समर्थ, अॅड. अनिल गोवारदीपे, अॅड. निहालसिंग राठोड, अॅड. मीर नगमान अली, अॅड. मिलिंद पिंपळगावकर, अॅड. रमेश शंभरकर, अॅड. प्रफुल्ल अंबादे, अॅड. कमल सतुजा, अॅड. विलास राऊत, अॅड. अर्चना रामटेके, अॅड. जगदीश उके आदी सहभागी झाले होते.