निवृत्तीनंतरही एसटी कर्मचाऱ्यांचे हालच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:07 AM2021-07-30T04:07:49+5:302021-07-30T04:07:49+5:30
नागपूर : एसटी कर्मचाऱ्यांची निवृत्तीनंतरही फरफट थांबताना दिसत नाही. निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अद्यापही शिल्लक असलेल्या सुट्या आणि एकतर्फी वेतनवाढीची ...
नागपूर : एसटी कर्मचाऱ्यांची निवृत्तीनंतरही फरफट थांबताना दिसत नाही. निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अद्यापही शिल्लक असलेल्या सुट्या आणि एकतर्फी वेतनवाढीची थकबाकी मिळालेली नाही. एसटी महामंडळाच्या नागपूर विभागातील जवळपास २८५ कर्मचाऱ्यांचे २ कोटी १६ लाख रुपये एसटी महामंडळाकडे थकीत आहेत. ही रक्कम त्यांच्या म्हातारपणात जगण्याचा आधार आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने ही थकबाकी त्वरित देऊन निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.
जिल्ह्यातील आगार : ८
अधिकारी : ४१
कर्मचारी : २६६६
बसचालक : ९२३
वाहक : ७४९
थकबाकीची वाट पाहत असताना मृत्यू
-निवृत्त झाल्यानंतर अनेक कर्मचारी शिल्लक असलेल्या सुट्यांचे आणि एकतर्फी झालेल्या करारातील वेतनवाढीच्या पैशांची वाट पाहत होते. परंतु नागपूर विभागातील जवळपास १५ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे आणि नैसर्गिक मृत्यू झाला. थकबाकीची वाट पाहत असताना थकबाकी मिळण्यापूर्वीच त्यांना या जगाचा निरोप घ्यावा लागला. त्यामुळे एसटी महामंडळाने उर्वरीत कर्मचाऱ्यांना त्वरित थकबाकी देण्याची गरज आहे.
थकबाकी द्यावी
`सहा महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झालो. परंतु अद्यापही संचित रजेचे आणि एकतर्फी कराराची रक्कम मिळाली नाही. आधीच निवृत्तीची रक्कम कमी मिळाली. त्यात ही रक्कम न मिळाल्यामुळे आर्थिक टंचाई जाणवत आहे.`
मोहम्मद कदीर मो. हनिफ, निवृत्त चालक
पतीच्या मृत्यूनंतर तरी थकबाकी मिळावी
`माझे पती सेवानिवृत्त होऊन १५ महिन्याचा कालावधी उलटला. त्यांचा मृत्यू होऊन पाच महिने झालेत. तरीसुद्धा एसटी महामंडळाने सेवानिवृत्तीचे मिळणारे लाभ अद्यापपर्यंत दिलेले नाहीत. एसटीच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवून आम्ही त्रासलो आहोत. त्यामुळे एसटी महामंडळाने थकबाकीची रक्कम देऊन आम्हाला दिलासा द्यावा.`
संध्या लांजेवार, पत्नी स्व. किरण लांजेवार, सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रक
थकबाकी त्वरित द्यावी
‘निवृत्त झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांना त्यांची थकबाकी देणे गरजेचे आहे. परंतु अनेक कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे तसेच नैसर्गिक मृत्यू झाल्यामुळे त्यांचे कुटुंबीय अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने निवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांची थकबाकी त्वरित देऊन त्यांना दिलासा देण्याची गरज आहे.’
-अजय हट्टेवार, प्रादेशिक सचिव, एसटी कामगार संघटना
निधी उपलब्ध होताच थकबाकी देऊ
‘सद्यस्थितीत एसटीचे उत्पन्न अत्यल्प आहे. वाहतूक पूर्णपणे सुरू नाही. त्यामुळे सध्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम देणे शक्य नाही. वरिष्ठ स्तरावरून निधी उपलब्ध होताच संबंधित निवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत रक्कम देण्यात येईल.’
-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग
..........