नागपूरकरांसाठी ‘ताप’ वाढविणारी परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:08 AM2021-04-02T04:08:04+5:302021-04-02T04:08:04+5:30

निशांत वानखेडे नागपूर : राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) द्वारे सादर अलीकडच्या पर्यावरण परिस्थिती अहवालावरून नागपूरकरांसाठी ‘ताप’दायक माहिती ...

Conditions that increase 'fever' for Nagpurkars | नागपूरकरांसाठी ‘ताप’ वाढविणारी परिस्थिती

नागपूरकरांसाठी ‘ताप’ वाढविणारी परिस्थिती

Next

निशांत वानखेडे

नागपूर : राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) द्वारे सादर अलीकडच्या पर्यावरण परिस्थिती अहवालावरून नागपूरकरांसाठी ‘ताप’दायक माहिती समोर येत आहे. गेल्या दोन दशकांत नागपूरच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. २००० ते २०१९ या काळात सरासरी वार्षिक तापमानात ८० टक्क्यांची वाढ झाली आहे आणि हीट वेव्हजच्या इव्हेंटमध्ये ८५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

हवामान विभागाकडून मिळालेल्या १९७० पासूनच्या आकडेवारीवरून हवामान बदलाच्या संदर्भातील अभ्यासावरून ही परिस्थिती समोर येत आहे. ४९ वर्षांचा डेटा समोर ठेवून प्रत्येक वर्षातील बदलांचा अभ्यास करण्यात आला. यावरून गेल्या ५० वर्षांच्या तुलनेत २०००-२०१९ या दोन दशकांत सरासरी वार्षिक तापमानात मोठी वाढ झाली आहे. २०१० ते २०१९ या दशकात अतिउष्णतेचे दिवस आणि रात्र ९.३ टक्क्यांनी वाढले. अतिउष्ण लहरींचा अभ्यास केला असता १९८० ते २००० पर्यंत दोनदा हीट वेव्हजची परिस्थिती अनुभवली जी २०००-२०१९ च्या काळात १८ पर्यंत वाढली आहे. दिवसाचे कमाल तापमान ३३ अंशापर्यंत व रात्रीचे किमान तापमान २० अंशाच्या आसपास सामान्य मानले जाते. मात्र, दोन दशकांत किमान तापमान ३३.३ अंशापर्यंत तर कमाल तापमान ४५ अंशाच्याही वर जात असून ही धोक्याची घंटा असल्याचे नीरी वैज्ञानिकांनी नमूद केले आहे.

तसे हवामान बदल व तापमान वाढीमुळे पावसाच्या पॅटर्नमध्ये फारसा बदल झाला नसला तरी पावसाच्या काळामध्ये कमालीचा बदल दिसून येत असल्याचे दिसून येत आहे. मागील १० वर्षांत मान्सून काळातील सरासरी पावसामध्ये वाढ झाली आहे; पण पावसाच्या दिवसांमध्ये घट झाली आहे. म्हणजे तो कधी ठरावीक काळात अधिक पडतो; पण बाकी दिवस कोरडे जातात. अवकाळी पावसाचे प्रमाण वाढले; पण हिवाळा व मान्सून नसलेल्या काळातील पावसाचे प्रमाण ३७.४३ टक्क्यांनी घटले आहे. काही ठरावीक काळात हाेणाऱ्या पावसामुळे महापूर, अवर्षण, इन्फ्रास्ट्रक्चरचे नुकसान व आजार हाेण्याची शक्यता अधिक असते.

अहवालातील ‘हीट’ हायलाइट

- २०००-२०१९ मध्ये सरासरी वार्षिक तापमानात ८० टक्के वाढ.

- दाेन दशकांत हीट इव्हेंट्स ८५ टक्के वाढले. अतिउष्ण दिवस व रात्रीत ९.३ टक्के वाढ.

- १८ अतिउष्ण लहरी २००० ते २०१९ मध्ये. १९८०-२००० पर्यंत केवळ २.

- १६ वेळा सर्फेस टेम्प्रेचर सरासरीपेक्षा वर गेले. १९८० ते २००० पर्यंत ८ वेळा.

- २० वर्षांपैकी १५ वर्षे उष्ण लहरींचे ठरले.

- सरासरी पर्जन्यमान १६.४ टक्क्यांनी वाढले; पण पावसाचे सरासरी दिवस १६ टक्क्यांनी घटले.

- दक्षिणपूर्व मान्सूनच्या दिवसातही १२.२ टक्के घट.

Web Title: Conditions that increase 'fever' for Nagpurkars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.