संशोधन लोकांपर्यंत मातृभाषेत पोहोचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 01:55 PM2019-10-30T13:55:10+5:302019-10-30T14:05:52+5:30
संशोधन हे स्थानिक भाषेत, मातृभाषेत लोकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी येथे केले .
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सामान्य लोकांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणणे म्हणजे विज्ञान होय. कुठलेही वैज्ञानिक संशोधन हे तेव्हाच फायद्याचे ठरेल जेव्हा त्या संशोधनाचे फायदे सामान्य लेकांपर्यंत पोहोचतील. यासाठी जनजागृती मोहीम राबवण्याची गरज आहे. ही मोहीम लोकचळवळ होणे आवश्यक आहे. हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा ते संशोधन त्याचे लाभ लोकांना समजतील, त्यामुळे संशोधन हे स्थानिक भाषेत, मातृभाषेत लोकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी येथे कले.
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान (नीरी) येथे १५ व्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. ‘जीवविज्ञान, चिकित्सा आणि पर्यावरणात धातू आयन आणि कार्बनिक प्रदूषक’ या विषयावर आयोजित या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते बुधवारी सकाळी करण्यात आले. त्यामुळे संशोधक व शास्त्रज्ञांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी नायर हॉस्पिटल मुंबईच्या असोसिएट प्रोफेसर डॉ. सुनाली खन्ना होत्या. तर महापौर नंदा जिचकार, खा. डॉ. विकास महात्मे, नीरीचे निदेशक डॉ. राकेश कुमार, प्रो. डॉ. पॉल टेक्नवोव (युएसए), आरोग्य मंत्रालय नवी दिल्लीचे डॉ. टी.के. जोशी आणि डॉ. हेमंत पुरोहित प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर उपराष्ट्रपती नायडू यांनी नीरी परिसरात वृक्षरोपण केले. चर्चासत्राच्या अध्यक्ष डॉ. सुनाली खन्ना यांनी आंतरराष्ट्रीय चर्चासत्राबाबत माहिती दिली. डॉ. पॉल, डॉ.टी.के. जोशी यांनीही आपले विचार व्यक्त केले. डॉ. राकेश कुमार यांनी स्वागतपर भाषण केले. डॉ. हेमंत पुरोहित यांनी आभार मानले.
अन् उपराष्ट्रपतींनी मराठीतून साधला संवाद
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी भाषणाची सुरुवातच नमस्कार करीत मराठीतून केली. येथे येऊन मला खूप आनंद झाला असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण भाषण इंग्रजीतून केले. दरम्यान एकदा हिंदीतूनही संवाद साधला.
एस समाज एक लक्ष्य. जलजागृती अभियान
यावेळी निरीतर्फे ‘एक समाज एक लक्ष हा लोकसहभागावर आधारित जलजागृतीपर अभियानाचा शुभारंभ उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आला. या मोेहिमेअंतर्गत लुप्त झालेल्या नद्यांचे लोकसहभागाने पुनरुज्जीवन तसेच जलसाक्षरता व संवर्धन या विषयीचे उपक्रम स्वयंसेवी सस्थांच्या माध्यामतून निरीतर्फे हाती घेण्यात येणार आहे.
वैज्ञानिकांच्या प्रयोगशाळेतील संशोधन बाहेर काढून ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. हाच या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचा मुख्य उद्देश आहे, असे नीरी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या अध्यक्षा आणि मुंबई येथील मुंबई महापालिकेच्या नायर हॉस्पिटल दंत महाविद्यालयाच्या असोसिएट प्रोफेसर डॉ. सुनाली खन्ना यांनी सांगितले.