संमेलनाध्यक्ष-महामंडळात शह-काटशहचा खेळ ?
By admin | Published: February 1, 2017 02:32 AM2017-02-01T02:32:46+5:302017-02-01T02:32:46+5:30
साहित्य आणि राजकारण या तशा दोन ध्रुवावरच्या दोन गोष्टी. झालेच तर एखादा साहित्यिक राजकारणात किंवा
आयोजक गोंधळात : पत्रिकेत नाव नाही, मग सहभागाचे निमंत्रण आले कसे?
शफी पठाण ल्ल नागपूर
साहित्य आणि राजकारण या तशा दोन ध्रुवावरच्या दोन गोष्टी. झालेच तर एखादा साहित्यिक राजकारणात किंवा राजकारणातला एखादा साहित्यविश्वात असू शकतो. परंतु साहित्याच्या क्षेत्रात मात्र राजकारण कुणालाच अपेक्षित नाही. डोंबिवलीत आयोजित ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील निमंत्रित साहित्यिकांची नावे ठरवताना मात्र असे ‘राजकारण’ घडल्याची चर्चा असून, संमेलनाध्यक्ष व साहित्य महामंडळात रंगलेल्या या शह-काटशहाचा खेळाचा फटका निमंत्रितांना बसल्याचे बोलले जात आहे. नागपुरातील काही साहित्यिकांना संमेलनाच्या विविध सत्रात सहभागाचे निमंत्रण आले आहे. परंतु पत्रिकेत मात्र कुठेही त्यांचे नाव नसल्याने संमेलनाला जायचे की नाही, या द्विधामनस्थितीत ते सापडले आहेत. साहित्य संमेलनात कोणाला निमंत्रित करायचे, याचा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व आयोजक संस्था हे मिळून घेत असतात. काही नावे घटक संस्थांमार्फत जात असतात. दोघांच्याही संमतीने एकदा का ही नावे ‘फायनल’ झाली की मगच कार्यक्रम पत्रिका छापायला पाठविली जाते. पत्रिका छापायला गेल्यानंतर कुठले नाव ठरविण्यात आले असे सहसा होत नाही. शहरातील प्रसिद्ध लेखिका अरुणा सबाणे आणि डॉ. अमृता इंदूरकर यांच्यासह आणखीही काही साहित्यिकांचे कार्यक्रम पत्रिकेत कुठेच नाव नाही. परंतु संमेलनात सहभागाचे पत्र त्यांना मिळाले आहे. या पत्रावर स्वागताध्यक्ष गुलाबराव वझे यांची स्वाक्षरी आहे. पत्रिकेत या नावांचा उल्लेख नाही, घटक संस्थांनी ती नावे पाठवलेली नाहीत, मग ही नावे आलीत कुठून, हा खरा प्रश्न आहे. याबाबत सूत्रांकडून माहिती घेतली असता असे कळले की, संमेलनाध्यक्षांनी आपल्या अधिकारात काही नावे आयोजकांना सूचविली, आयोजकांनी ती नोंदवूनही घेतली. परंतु ही नावे संबधित घटक संस्थांकडून न आल्याने महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नियमावर बोेट ठेवत ती नाकारली. संमेलनाध्यक्षांना दुखवायचे नसल्याने आणि तिकडे महामंडळ नियमाचे कारण पुढे करीत असल्याने कैचीत सापडलेले आयोजक पार गोंधळले व या विशिष्ट नावांशिवाय पत्रिका ‘फायनल’ झाली, असे सूत्रांचे म्हणणे आहे. परंतु सहभागाच्या निमंत्रणाचे पत्र गेल्याने आता त्यांना नाही बोलावले तर चुकीचा संदेश जाईल, असे आयोजकांना वाटले व पत्रिकेत नाव नसतानाही वर उल्लेखित साहित्यिकांना पुन्हा निमंत्रणाचे ‘फोन कॉल्स’ गेल्याचेही या सूत्रांनी सांगितले.
संमेलनात सहभागाचे निमंत्रण पत्र मला आले. त्यानुसार पत्रिकेत नाव असणे अपेक्षितच होते. परंतु प्रत्यक्ष पत्रिका हातात आली तेव्हा मात्र नाव दिसले नाही. आयोजकांकडे चौकशी केली असता त्यांनी तुम्ही निमंत्रित आहात आणि तुम्हाला यायचेच आहे, असे सांगितल्याने मी संमेलनाला जात आहे.
- अरुणा सबाणे
मी तसेही संमेलनाला जाणारच होते. आता मला आयोजकांकडून सहभागाबाबत निमंत्रणाचा फोन आला आहे. त्यामुळे मी संमेलनात प्रत्यक्ष सहभागी होणार आहे. राहिले गोष्ट पत्रिकेतील नावाची तर इतक्या मोठ्या आयोजनात अशी चूक घडू शकते. त्याला इतके महत्त्व देण्याची गरज नाही
- डॉ. अमृता इंदूरकर