शासनाचीदेखील कबुली...नागपुरातून सव्वा दोन हजारांहून अधिक महिला-मुली गायब
By योगेश पांडे | Published: December 19, 2023 07:43 PM2023-12-19T19:43:38+5:302023-12-19T19:44:09+5:30
प्रेमप्रकरणातून सर्वाधिक मुलींना पळवले
नागपूर: नागपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात महिला-मुली बेपत्ता होत असल्याची ओरड होत असताना पोलीस प्रशासनाकडून वेगवेगळी कारणे देण्यात येत होती. मात्र आता राज्य शासनानेच नागपूर जिल्ह्यातून केवळ ८ महिन्यांतच सव्वा दोन हजारांहून अधिक महिला-मुली गायब झाल्याची बाब कबुल केली आहे. विधानपरिषेदत प्रवीण दटके, चंद्रशेखर बावनकुळे इत्यादी सदस्यांनी याबाबत तारांकित प्रश्न मांडला होता. त्याच्या लेखी उत्तरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.
नागपूर जिल्ह्यात मार्च २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत नागपूर जिल्ह्यातून ३ हजार ८३८ व्यक्ती बेपत्ता झाले. त्यातील २ हजार ११ महिला व २२५ मुले-मुलींचा समावेश होता. अनेक अल्पवयीन मुली पालक रागविल्याने, अभ्यासाच्या कारणावरून मित्र मैत्रिणींसोबत फिरण्यासाठी तसेच कौटुंबिक कारणामुळे निघून जात असल्याचे तपासातून समोर आले आहे. मुलींना विविध आमिषे दाखवून मुलींना पळवून नेण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. यातील जास्तीत जास्त प्रकरणे प्रेम संबंधांचे आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे. जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्यांपैकी ३ हजार २३९ व्यक्ती आढळले.
तर उर्वरित जणांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. नागपूर पोलिसांनी पोलीस ठाणे स्तरावर भरोसा सेल व पोलीस दीदी हा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत शाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवणी वर्ग, झोपडपट्टी, महिला वसतीगृह अशा ठिकाणी पोलीस दिदींचे पथक भेट देऊन किशोरवयीन मुला-मुलींचे समुपदेशन करतात. शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत हरविलेल्या व्यक्तींच्या सापडण्याचे प्रमाण ८८ टक्के तर पळवून नेलेल्या व्यक्तींच्या सापडण्याचे प्रमाण ९४ टक्के असल्याचेदेखील उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.