गोपनीय डाटा व कागदपत्रे लिक : महामेट्रोचे वरिष्ठ महाव्यस्थापक व ऑपरेटरला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:48 AM2019-07-11T00:48:17+5:302019-07-11T00:49:55+5:30
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांच्या आवाजात क्लिपिंग तयार करून गोपनीय डाटा आणि कागदपत्रे लिक करण्याचे प्रकरण पुढे आले आहे. या प्रकरणी सदर पोलिसांनी महामेट्रोचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक विश्वरंजन बेवरा आणि ऑपरेटर प्रवीण समर्थ यांच्याविरुद्ध आयटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून बुधवारी अटक केली. महामेट्रोमध्ये पहिल्यांदा अशा प्रकारचे प्रकरण समोर आल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांच्या आवाजात क्लिपिंग तयार करून गोपनीय डाटा आणि कागदपत्रे लिक करण्याचे प्रकरण पुढे आले आहे. या प्रकरणी सदर पोलिसांनी महामेट्रोचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक विश्वरंजन बेवरा आणि ऑपरेटर प्रवीण समर्थ यांच्याविरुद्ध आयटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून बुधवारी अटक केली. महामेट्रोमध्ये पहिल्यांदा अशा प्रकारचे प्रकरण समोर आल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बेवरा यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू होती. काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित केले होते. त्यामुळे बेवरा दुखावले होते. बृजेश दीक्षित दररोज सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महामेट्रोच्या संचालकांसोबत बातचित करतात आणि नियमित कामासंदर्भात निर्देश देतात. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगकरिता तांत्रिक कर्मचाऱ्यांची चमू नियुक्त केली आहे. या चमूत ऑपरेटर प्रवीण समर्थ होता. बेवराने प्रवीणला विश्वासात घेऊन दीक्षित यांच्यातर्फे त्यांच्याविरोधात करण्यात येणाऱ्या चर्चा रेकॉर्डिंग करण्यास सांगितले. त्यानुसार प्रवीणने दीक्षित यांच्यातर्फे बेवरा यांच्या संदर्भात केलेली चर्चा मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली. त्याने हे रेकॉर्डिंग बेवरा यांना दिले.
काही दिवसांपूर्वी बृजेश दीक्षित यांना व्हॉट्सअॅपवर एक क्लिपिंग प्राप्त झाली. त्यामध्ये दीक्षित एका संचालकासोबत बातचित करीत होते. क्लिपिंग ऐकून दीक्षित अवाक झाले. त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या चमूतील कुणीतरी लिप्त असल्याची शंका व्यक्त करण्यात आली. या दिशेने चौकशी केली असता प्रवीणने बेवरा यांनी क्लिपिंग दिल्याची बाब कबूल केली. या आधारावर महामेट्रोचे अतिरिक्त व्यवस्थापक आशीष कुमार संघी यांनी सदर ठाण्यात तक्रार नोंदविली. सदर पोलिसांनी बुधवारी आयटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून विश्वरंजन बेवरा आणि प्रवीण समर्थला अटक केली. नंतर दोघांनाही जामीन देण्यात आला आहे.