‘त्या’ बँकेवर जप्तीची कारवाई २८ ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:08 AM2021-01-22T04:08:34+5:302021-01-22T04:08:34+5:30
नागपूर : महाल, शुक्रवारी तलावजवळील महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या (मर्यादित) जप्तीची कारवाई आता २८ जानेवारीला होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या ...
नागपूर : महाल, शुक्रवारी तलावजवळील महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या (मर्यादित) जप्तीची कारवाई आता २८ जानेवारीला होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार तहसीलदार यांनी आदेश काढल्याची माहिती आहे.
भंडारा येथील वैनगंगा सह. साखर कारखान्यावर कर्ज असल्याने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादित यांनी कारखान्यावर जप्तीची कारवाई केली. त्यानंतर २०१० मध्ये त्याचा लिलाव केला. त्यावेळी १४ कोटीत विक्री झाली. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी पगार, पीएफ व इतर रक्कम देण्यासाठी भंडाराच्या औद्यागिक न्यायालयात दाद मागितली. औद्यागिक न्यायालयाने १३ कोटी ८९ लाख ८४ हजार ३३४ रुपये कामगारांचे देण्याचे आदेश बँकेला दिले. या आदेशाच्या विरोधात बँकेने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने औद्योगिक न्यायालयाचा आदेश योग्य ठरविला. त्यामुळे याच्या विरोधात बँकेने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. सर्वोच्च न्यायालयानेही डिसेंबर २०१९ ला कामगारांच्या बाजूने निर्णय दिला. परंतु बँकेकडून रक्कम कामगारांना मिळाली नाही. बँकेची मालमत्ता नागपूरमध्ये असल्याने भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी नागपूर जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रकरण वर्ग केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाप्रमाणे तहसीलदार यांनी बँकेची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश काढले.