जिल्हाध्यक्षासाठी मुळक-केदारांमध्ये सामना

By admin | Published: February 17, 2016 03:04 AM2016-02-17T03:04:40+5:302016-02-17T03:04:40+5:30

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी नागपुरात येत स्थानिक नेत्यांशी ‘वन टू वन’ करून जिल्हाध्यक्ष बदलण्याचे संकेत

Confrontation between the principal and the Kedar for the district | जिल्हाध्यक्षासाठी मुळक-केदारांमध्ये सामना

जिल्हाध्यक्षासाठी मुळक-केदारांमध्ये सामना

Next

कमलेश वानखेडे ल्ल नागपूर
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी नागपुरात येत स्थानिक नेत्यांशी ‘वन टू वन’ करून जिल्हाध्यक्ष बदलण्याचे संकेत दिले. त्यामुळे आपल्या गटाचा अध्यक्ष करण्यासाठी नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. यातून पुन्हा एकदा गटबाजी उफाळून येण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्याला पद मिळाले तर नेते त्याला कितपत काम करू देतील यात शंकाच आहे. यावर उपाय म्हणून पक्षश्रेष्ठींनी राष्ट्रवादीचा फॉर्म्युला स्वीकारण्याची तयारी चालविली आहे. राष्ट्रवादीने माजी मंत्री अनिल देशमुख व रमेश बंग यांच्याकडे अध्यक्षपद सोपविले. त्याच धर्तीवर माजी मंत्री राजेंद्र मुळक किंवा आ. सुनील केदार यांच्यापैकी एकाकडे जिल्हाध्यक्षपद सोपवायचे, असा विचार सुरू आहे.
माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक इच्छुक असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात. मात्र, मुळक यांनी पत्ते उघडलेले नाही. ‘तसं काहीच नाही’ असे ते नेहमीप्रमाणे सांगताहेत. विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक मुळक यांनी लढवावी, असा आदेश पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आला होता. मात्र, मुळक यांनी लढण्यास असमर्थता व्यक्त केली. परिणामी ऐनवेळी काँग्रेसला उमेदवारासाठी धावाधाव करावी लागली होती. राज्यमंत्री म्हणून काम केले असताना व विद्यमान आमदार असतानाही संकटाच्या काळात मुळक यांनी पक्षाला नकार दिला. आता प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण त्यांना जिल्ह्याचे अध्यक्षपद सोपवून ‘माघारी’चे बक्षीस देणार का, असा सवाल त्यांचेच स्वपक्षीय ‘मित्र’ करीत आहेत. तर मुळक मितभाषी आहेत, जिल्हाभर संपर्क आहे, आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी ते ‘रसद’ पुरवू शकतात, त्यांचा पक्षाला फायदा होईल, अशी जमेची बाजू त्यांचे समर्थक मांडत आहेत.
आ. सुनील केदार यांनी नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांच्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. गुडधे यांचे वडील माजी मंत्री विनोद गुडधे पाटील ज्या पश्चिम नागपूर मतदारसंघातून लढायचे त्याचा बराचसा भाग सध्या हिंगणा विधानसभा मतदारसंघात आहे. गुडधे यांचा ग्रामीणमध्ये गोतावळा असून जनसंपर्कही आहे, अशी शिफारस केदार करीत आहेत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दक्षिण-पश्चिम मतदारसंघात टक्कर देण्यासाठी गुडधे यांच्या रूपात उरलेला एकमेव उमेदवार ग्रामीणमध्ये नेऊन पुढील निवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीस यांना ‘वॉकओव्हर’ देणार का, ग्रामीणमध्ये दुसरे नेतृत्वच उरले नाही का, असे प्रश्न पुढे येऊ लागले आहेत. अध्यक्ष आपल्या मर्जीतील व्हावा, यासाठी केदार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गुडधे यांचे नाव काही कारणास्तव मागे पडले तर दुसऱ्यांकडे अध्यक्षपद जाऊ देण्यापेक्षा केदार ऐनवेळी स्वत:ची दावेदारी पुढे करू शकतात, अशी विश्वसनीय माहिती आहे. एवढी वर्षे मंत्री राहिलेले राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, रमेश बंग हे अध्यक्ष होऊ शकतात, तर केदार का नाही, असा युक्तिवाद त्यांचे समर्थक करीत आहेत. केदार यांचा जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात स्वत:चा गट आहे. शिवाय जिल्हा परिषदेच्या राजकारणात ते माहीर आहेत. याचा पक्षाला फायदा होऊ शकतो. मात्र, केदारांकडे अध्यक्षपद गेले तर जिल्ह्यात पुन्हा केदार गट बलवान होईल काँग्रेस दुबळी होईल, असा धोका ज्येष्ठ नेत्यांना वाटत आहे.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्यामदेव राऊत यांच्या कन्या व जि.प.च्या माजी सदस्य कुंदा राऊत यांनी हिंगणा विधानसभेची निवडणूक लढविली. रामटेक लोकसभेच्या युवक काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. एका महिला अध्यक्षांना बदलून त्यांच्या जागेवर महिला नेतृत्वाला संधी दिली तर समतोल साधला जाऊ शकतो. मात्र, सुनील केदार, राजेंद्र मुळक, नाना गावंडे या तीन दिग्गज नेत्यांना सांभाळणे राऊत यांना जमेल का, हा खरा प्रश्न आहे. कोणत्या नेत्याचा आदेश मानायचा, कोणत्या नेत्याचा सल्ला घ्यायचा, अशा अनेक पेचांना त्यांना सामोरे जावे लागेल. अशात राऊत यांचा हिरमोड होऊन पक्षाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
सुरेश भोयर यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले आहे. त्या वेळी भाजपमध्ये असलेल्या भोयर यांना अध्यक्ष बनविण्यासाठी नाना गावंडे, सुनील केदार, राजेंद्र मुळक हे तिन्ही नेते एकत्र आले होते. मात्र, ही एकी काही काळच टिकली. चार महिन्यातच भोयर आपले ऐकत नाही, दुसऱ्याचेच ऐकतात असे या तिन्ही नेत्यांना वाटू लागले आणि शेवटी भोयर यांचीच गोची झाली होती.
त्यामुळे आता भोयर यांच्यासाठी संबंधित तिन्ही नेते पुन्हा एकदा एकदिलाने होकार भरतील, अशी शक्यता कमीच आहे. कामठी विधानसभेत भोयर यांचे तिकीट कापून मुळक यांना देण्यात आले. त्यानंतरही भोयर हे मुळक यांच्या प्रचारासाठी फिरले, ही भोयर यांच्यासाठी जमेची बाजू आहे.(प्रतिनिधी)

...तर गावंडे पुन्हा कायम
४प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी जिल्हाध्यक्ष सुनीता गावंडे यांच्याजागी नवा चेहरा देण्याचे निश्चित केले आहे. माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्याशी चर्चेअंती लवकरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, बदल होण्याचे संकेत मिळताच जिल्ह्यातील काँग्रेस नेते आपल्या गटाकडे पद खेचण्यासाठी सक्रिय झाले आहेत. नेत्यांमध्ये यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. हा वाद टोकाला गेला तर आणखी काही महिने सुनीता गावंडे यांच्याकडे अध्यक्षपद कायम ठेवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही; तसेही काँग्रेसमध्ये कोणताही निर्णय सहजासहजी होत नाही, असा आजवरचा अनुभव आहे.
वासनिक ‘कुल’
४माजी केंद्रीय मंत्री व अ.भा. काँग्रेस समितीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्या संमतीशिवाय नवा अध्यक्ष ठरणार नाही, हे निश्चित आहे. जिल्ह्यात राजकीय पारा चढला असताना वासनिक मात्र ‘कुल’ आहेत. वासनिक कुणाला झुकते माप देतात, याकडे लक्ष लागले आहे. वासनिकांना जवळचा-दूरचा हे प्रकार चालत नाही. व्यक्तिगत मतभेद बाजूला सारून पक्षहित डोळ्यासमोर ठेवून प्रसंगी ते कठोर निर्णय घेतात. त्यामुळे ११ महिन्यांनी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत ‘पंजा’ची ताकद वाढविण्याची क्षमता असलेल्या नेत्याच्या हातीच ते जिल्ह्याची धुरा सोपवतील, असे मानले जात आहे.

Web Title: Confrontation between the principal and the Kedar for the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.