यंदा नागपुरातील गणपती, दुर्गोत्सवाबाबत संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 09:59 PM2020-05-30T21:59:55+5:302020-05-30T22:02:00+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी आहे. लॉकडाऊनमुळे गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, रमजान ईद आदी उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे होऊ शकले नाही. त्यामुळे यंदा गणेशोत्सव, दुर्गोत्सव, शारदा उत्सव, पोळा आदी साजरे होणार की नाही? असा प्रश्न सार्वजनिक उत्सव मंडळांना पडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी आहे. लॉकडाऊनमुळे गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, रमजान ईद आदी उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे होऊ शकले नाही. त्यामुळे यंदा गणेशोत्सव, दुर्गोत्सव, शारदा उत्सव, पोळा आदी साजरे होणार की नाही? असा प्रश्न सार्वजनिक उत्सव मंडळांना पडला आहे.
ऑगस्ट महिन्यापासून विविध धार्मिक उत्सवांना व सण-समारंभांना सुरुवात होणार आहे. शहरात जन्माष्टमी (दहीहंडी), पोळा, तान्हा पोळा, गणेशोत्सव, दुर्गा उत्सव, शारदा उत्सव असे अनेक कार्यक्रम सार्वजनिकरीत्या साजरे केले जातात. यासाठी मंडळांना मंडप, डेकोरेशन, रोशनाई आदींच्या ऑर्डरपासून तर प्रशासनाच्या विविध परवानगीपासून अनेक कामे करावी लागतात. त्यामुळे किमान दोन महिन्यापूर्वीपासूनच मंंडळांना याची तयारी करावी लागते. या उत्सवांवर नागपुरातील छोटे-मोठे व्यावसायिक, मूर्तिकार, डेकोरेशनवाले यांचा उदरनिर्वाह चालतो. लॉकडाऊनमुळे सर्वच बंद असल्याने तेही सध्या या उत्सवाची वाट पाहत आहेत. परंतु देशात सुरू असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील उत्सवही सार्वजनिकरीत्या साजरे होणार की नाहीत, याबाबत संभ्रम आहे. तयारी केली आणि प्रशासनाने वेळेवर परवानगी नाकारली तर काय करणार? असा प्रश्न सार्वजनिक मंडळांसह मूर्तिकार व व्यावसायिकांनाही पडला आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या धार्मिक उत्सवांच्या कार्यक्रमासंबंधी जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांनी संबंधित विभागांची बैठक घेऊन गणेशोत्सव, दुर्गोत्सव व इतर उत्सवांबाबतची नियमावली आताच जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांना पत्र पाठवून केली आहे.