फडणवीस-गडकरींपुढे आमदारांचा पेच : कुणाचे तिकीट कटणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 08:40 PM2019-09-26T20:40:00+5:302019-09-26T20:42:02+5:30
नागपूर शहर व जिल्ह्यातील भाजपच्या ११ आमदारांपैकी पुन्हा कुणाला संधी द्यायची व कुणाला थांबण्याचा सल्ला द्यायचा, असा पेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापुढे निर्माण होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहर व जिल्ह्यातील भाजपच्या ११ आमदारांपैकी पुन्हा कुणाला संधी द्यायची व कुणाला थांबण्याचा सल्ला द्यायचा, असा पेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापुढे निर्माण होणार आहे. शिवसेनेसोबत युती झाल्यास शिवसेनेचा विशिष्ट मतदारसंघांसाठी असलेला आग्रह व लोकसभा निवडणुकीतील परफॉर्मन्सचे भाजपने केलेले ऑडिट या मुद्यांवर काही आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागपूर शहरातील सहाही मतदारसंघ व ग्रामीणमधील सावनेर वगळता उर्वरित पाच मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. यावेळी शिवसेनेने युतीत ग्रामीणमधील रामटेक, काटोल व सावनेर तर शहरातील पूर्व व दक्षिण नागपूर अशा एकूण पाच जागांची मागणी भाजपकडे केली आहे. युती झाली तर किमान एक- दोन जागा तरी शिवसेनेसाठी सोडाव्या लागतील. त्यामुळे संबंधित जागेवर असलेल्या विद्यमान भाजप आमदाराला नारळ मिळणे निश्चित आहे. सेनेच्या वाटाघाटीत मतदारसंघ कायम राखण्यात भाजपच्या श्रेष्ठींना यश आलेही तरी आमदारांवरील संकट टळले असे नाही. कारण, प्रत्येक मतदारसंघात भाजपच्या आमदारांना पक्षांतर्गत तगड्या दावेदारीला सामोरे जावे लागत आहेत.
लोकसभेच्या निवडणुकीत दक्षिण-पश्चिम व पूर्व नागपूर वगळता शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघात भाजपचे मताधिक्य घटले. उत्तर नागपुरात तर काँग्रेसला आघाडी मिळाली. मध्य उत्तर व दक्षिण नागपुरातील भाजपच्या मताधिक्यात घट झाली. शिवाय पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणात काही आमदारांचा जनतेतील ग्राफ घसरल्याचे समोर आले आहे. शिवाय गेल्या १० ते १५ वर्षांपासून उमेदवारीसाठी वेटिंगवर असलेले इच्छुक उमेदवारही यावेळी ताकदीने समोर आले असून त्यांनी वैयक्तिक पातळीवर ‘कॅम्पेन’ सुरू केले आहे. मध्य नागपुरात हलबा समाजाचे प्राबल्य आहे. विद्यमान आमदारांना बदलायचे झाले तरी त्यांच्या जागी हलबा उमेदवार दिला तरच जागा वाचविता येईल, असा पक्षाचा अहवाल आहे.
घटस्थापनेनंतर नागपूरचा निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेशी सुरू असलेली युतीची चर्चा व राज्यभरातील भाजपचे उमेदवार ठरविण्यात व्यस्त आहेत. नागपूरचा कुठलाही निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपसात चर्चा करून घेतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घटस्थापनेनंतर फडणवीस-गडकरी हे दोन्ही नेते नागपूरच्या विषयावर बसतील व निर्णय घेतील. तोवर आमदारांची धाकधूक कायम राहणार आहे.