लढायचे कुठून; नव्या की जुन्या प्रभागातून! रचना बदलल्याने नगरसेवकांना चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2022 12:24 PM2022-02-08T12:24:12+5:302022-02-08T12:34:42+5:30
सध्या चार नगरसेवकांचा एक प्रभाग आहे. त्रिसदस्यीय प्रभाग रचनेत अनेक नगरसेवकांच्या प्रभागात मोठे फेरबदल झाले आहेत. प्रभागाचा काही भाग वगळण्यात आला असून काही प्रभागांना नव्याने भाग जोडण्यात आले आहेत.
नागपूर : महापालिका निवडणुकीत प्रभाग रचना बदलली आहे. चारऐवजी तीन सदस्यीय प्रभागानुसार आगामी निवडणुका होत आहेत. काही प्रभागातील ७० टक्के तर काहीतील ३० टक्के भाग बदलला आहे. यामुळे नवीन प्रभागातून लढायचे की जुन्या, असा गंभीर प्रश्न विद्यमान नगरसेवकांना पडला आहे.
मागील तीन, चार टर्मपासून नगरसेवक असलेल्या काही नगरसेवकांच्या नवीन प्रभागात जुने दोन वॉर्ड जोडण्यात आले आहेत. अशा नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे. तर नवीन रचनेत जुना एक वॉर्ड असलेल्यांची चिंता वाढली आहे. अशा प्रभागांची संख्या मोठी आहे. अर्थातच सर्वाधिक विद्यमान १०८ नगरसेवक सत्ताधारी भाजपचे आहेत. निवडणुकीला सामोरे जाताना प्रत्येक प्रभागात एक वजनदार नगरसेवकाची इतर दोघांना मदत होईल असे तिकीट वाटप होण्याची शक्यता आहे.
नवीन प्रभागातून लढण्याची तयारी
आक्षेपानंतरही नवीन प्रभाग रचनेत फारसा बदल होण्याची शक्यता नसल्याने व जुना प्रभाग सोयीचा नसलेल्या काही नगरसेवकांनी लगतच्या प्रभागातून लढण्याची तयारी सुरू केली आहे. जनसंपर्कासोबतच प्रभागातील समस्या, प्रलंबित विकासकामांचा आढावा घेऊन कामे मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नवीन कामे सुचविण्याला सुरुवात झाली आहे.
विकास कामांच्या भूमीपूजनाची तयारी
सध्या चार नगरसेवकांचा एक प्रभाग आहे. त्रिसदस्यीय प्रभाग रचनेत अनेक नगरसेवकांच्या प्रभागात मोठे फेरबदल झाले आहेत. प्रभागाचा काही भाग वगळण्यात आला असून काही प्रभागांना नव्याने भाग जोडण्यात आले आहेत. याचा विचार करता निवडणुकीपूर्वी विकासकामांचे भूमीपूजन करण्याची तयारी सुरू केली आहे. २०१७ च्या निवडणुकीतही भूमीपूजनाचा धडाका लावला होता. मात्र यातील अनेक कामे अजूनही झालेली नाही.
आरक्षणावर ठरणार भवितव्य
महापालिकेत ५२ प्रभागातून १५६ नगरसेवक निवडून येणार आहेत. यातील ७८ जागा महिलासांठी राखीव असल्याने सर्व प्रभागात एक जागा महिलांसाठी राखीव राहील. तर २६ प्रभागात दोन जागा महिलांसाठी राखीव राहणार आहे. याचा विचार करता आरक्षण सोडतीवर काही विद्यमान नगरसेवकांची राजकीय भवितव्य ठरणार आहे.