पालकमंत्र्यांच्या दाव्याने संभ्रम वाढीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:08 AM2021-04-06T04:08:00+5:302021-04-06T04:08:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सोमवार रात्री ८ वाजेपासून महाराष्ट्रासह नागपुरातदेखील कडक निर्बंध लागू झाले आहेत. अत्यावश्यक सेवा व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोमवार रात्री ८ वाजेपासून महाराष्ट्रासह नागपुरातदेखील कडक निर्बंध लागू झाले आहेत. अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद राहतील, असे मनपा आयुक्तांनी स्पष्ट केले. मात्र दुसरीकडे पालकमंत्री नितीन राऊत यांनी मात्र सकाळी ७ पासून सर्वकाही सुरू राहणार असल्याचा दावा केला आहे. पालकमंत्र्यांच्या या दाव्यामुळे व्यापारीवर्गासह सामान्य जनतेमध्ये संभ्रम प्रचंड वाढला आहे.
सोमवारी दिवसभर कडक निर्बंधांबाबत जनतेमध्ये विविध चर्चांना उधाण आले होते. त्यातच पालकमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सकाळी ७ पासून दुकाने उघडी राहतील, असे स्पष्ट केले. आठवडाभर रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत आठवडाभरासाठी कडक निर्बंध राहतील, असे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले आहे. हा लॉकडाऊन नाही तर कडक निर्बंध आहेत. आदेशाबाबत कुठलाही संभ्रम नाही. सकाळी ७ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत दुकाने उघडी राहतील, असे प्रशासनाच्या नियमावलीत स्पष्ट लिहिले आहे, असे राऊत यांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात ३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून बाकी बाजार, दुकाने बंद राहतील, असे मनपा आयुक्तांच्या आदेशातदेखील स्पष्ट करण्यात आले आहे. असे असताना पालकमंत्र्यांनी असे वक्तव्य का दिले, असा प्रश्न जनतेतूनच उपस्थित होत आहे.
मंत्री बेजबाबदार वक्तव्य कसे देतात?
पालकमंत्र्यांच्या वक्तव्यावर भाजपकडून टीका करण्यात आली आहे. मनपा आयुक्तांनी राज्य शासनाच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करणारे आदेश काढले आहेत. मात्र नितीन राऊत यांनी बेजबाबदार वक्तव्य देऊन जनतेत संभ्रम निर्माण केला आहे. पालकमंत्री स्वत: मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित होते. मग राज्य शासनाच्या आदेश चुकीचे आहेत का व मंत्री असे बेजबाबदार वक्तव्य कसे देतात, असा प्रश्न शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके यांनी केला.