कन्हैयाच्या सभेत गोंधळ

By admin | Published: April 15, 2016 03:03 AM2016-04-15T03:03:16+5:302016-04-15T03:03:16+5:30

कन्हैया कुमारच्या सभेत चप्पल, जोडा भिरकावून, घोषणाबाजी करून काही तरुणांनी गोंधळ घातल्याने सभास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

Confusion in Kanhaiya Sabha | कन्हैयाच्या सभेत गोंधळ

कन्हैयाच्या सभेत गोंधळ

Next

जमावाकडून गोंधळ घालणाऱ्यांना चोप : जोरदार घोषणाबाजी
नागपूर : कन्हैया कुमारच्या सभेत चप्पल, जोडा भिरकावून, घोषणाबाजी करून काही तरुणांनी गोंधळ घातल्याने सभास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला होता. संतप्त नागरिकांनी गोंधळ घालणाऱ्या तरुणांना बेदम चोप दिला. पोलिसांनी वेळीच धाव घेऊन गोंधळ घालणाऱ्यांना जमावाच्या तावडीतून सोडवल्याने संभाव्य अनर्थ टळला.
धनवटे नॅशनल कॉलेजच्या सभागृहात बुधवारी आयोजित सभेला कन्हैया कुमार संबोधित करणार असल्याचे कळाल्याने सभागृहाच्या आतबाहेर मोठी गर्दी जमली होती. दुपारी २.१५ वाजता कन्हैया कुमारच्या भाषणाला सुरुवात होताच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत गोंधळ सुरू केला. त्यामुळे सभागृहातील उपस्थितांपैकी काही तरुणांनी त्यांना पकडून मारहाण करीतच बाहेर काढले.
मोठ्या संख्येत बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी त्यांना गराडा घातला. मात्र, पोलिसांच्या हातून खेचत संतप्त जमावाने त्या तरुणांना सभागृहाबाहेर जोरदार मारहाण केली. पोलिसांनी जमावाच्या तावडीतून कशीबशी सोडवणूक करून त्यांना आपल्या वाहनात बसवून धंतोली ठाण्यात आणले.
पोलिसांच्या वाहनात बसल्यानंतर त्यांनी भारत माता की जय आणि कन्हैया कुमार विरोधी घोषणा दिल्या. प्रत्युतरात पोलिसांच्या वाहनाला गराडा घालून आंबेडकरी अनुयायांनी ‘जय भीम... जय भीम’ची जोरदार घोषणाबाजी केली. ४० मिनिटांच्या कालावधीत जवळपास सारखे असे हे प्रसंग ४ वेळा घडले. दरम्यान, भाषण सुरू असताना कन्हैयाच्या दिशेने चप्पल, बुट फेकणाऱ्यापैकी हरिदास शेंडे यालाही जमावाने बुकलून बाहेर काढले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या सर्वांना पोलीस मुख्यालयात नेले. (प्रतिनिधी)

रस्त्यावरही घोषणाबाजी
सभागृहाबाहेर अशी घोषणाबाजी आणि तणावाचे वातावरण असताना महाविद्यालयाच्या गेटबाहेरही प्रचंड गर्दी होती. तेथे येऊन काही तरुण घोषणाबाजी करून पळून जात होते. त्यामुळे बाहेरही तणावाचे वातावरण होते. दोन वेळा वाहनातील तरुणांनी भारत माता की जय, अशी घोषणाबाजी केली. तर, काही तरुणांनी न्यू इंग्लिश हायस्कूलच्या गेट समोर भारत माता की जय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, अशी बराच वेळपर्यंत घोषणाबाजी केली.

पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त
कन्हैया कुमारच्या कार्यक्रमात प्रचंड गोंधळ होणार, अशी भीती वर्तविली जात असल्यामुळे पोलिसांनी धनवटे नॅशनल कॉलेजसमोर प्रचंड बंदोबस्त लावला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांची बुधवारी रात्री भेट घेतली. त्यांना संभाव्य धोके लक्षात आणून दिल्यानंतर स्टेज तसेच सभागृहात कन्हैयाच्या आजूबाजूला कोण असतील, एकमेकांना कोण कसे ओळखतील, त्याबाबत चर्चा करण्यात आली. निळी आणि लाल रिबीन एकत्र शिवून ती आयोजन समितीच्या कार्यकर्त्यांच्या दंडावर बांधण्याचे ठरले. कन्हैयाकुमार येण्याच्या तासाभरापूर्वीच पोलिसांनी डीएनसीचा ताबा घेतला होता. धंतोली तसेच अन्य पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसोबत शहर राखीव दल आणि राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या डीएनसीच्या आतबाहेर तैनात करण्यात आल्या होत्या. अजनीचे सहायक आयुक्त राठोड, धंतोलीचे ठाणेदार राजन माने पूर्णवेळ बंदोबस्तावर लक्ष ठेवून होते. तर, गोंधळ सुरू होताच उपायुक्त ईशू सिंधू, अभिनाश कुमार आणि शैलेश बलकवडे हे सुद्धा डीएनसीत आले.
बूट भिरकावणारा तरुण यवतमाळचा
कन्हैयाच्या सभेत बूट भिरकावणाऱ्या तरुणाचे नाव हरिदास मारोतराव शेंडे (वय २५) असून, तो यवतमाळचा रहिवासी आहे. तत्पूर्वी विमानतळावर दगडफेक आणि गोंधळ घालणारे बजरंग दलाचे कार्यकर्ते हितेश ऊर्फ बिट्टू सावडिया (वय २२), शानू ललित सावडिया (वय २२), शुभम राजेश अरखेडे (वय २०) आणि यश राजकुमार शर्मा (वय ३०) यांना सोनेगाव पोलिसांनी अटक केली. तर, डीएनसीत गोंधळ करून चप्पल, जोडा भिरकावल्याच्या आरोपात हरिदास शेंडे याच्यासह २१ जणांना धंतोली पोलिसांनी ताब्यात घेतले. दुपारी १.३० वाजता कन्हैया काछीपुऱ्यातील एका लॉजमध्ये जेवण घेण्यासाठी गेला होता. तेथे सत्कार करण्याच्या बहाण्याने दाखल झालेल्या काही तरुणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी परशू ठाकूरसह आठ जणांना ताब्यात घेतले. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण ३३ जणांना दिवसभरात ताब्यात घेतले. त्यातील शेंडे वगळता सर्वांना सोडण्यात आले.

Web Title: Confusion in Kanhaiya Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.