तीन संघटनांच्या वेगवेगळ्या आंदोलनामुळे नाभिक समाजात संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 10:48 PM2020-06-08T22:48:47+5:302020-06-08T22:50:40+5:30
दोन महिन्याच्या लॉकडाऊननंतर आता सरकार टप्प्याटप्प्याने व्यवहार खुले करत आहे. मात्र सलून-पार्लर व्यवसायाला अद्यापही मंजुरी न दिल्याने सलून दुकानदार आणि कारागिरांमध्ये काळजीचे वातावरण आहे. या संकटाच्या काळात समाजातील मुख्य संघटनांनी एकत्र येऊन सामूहिक नेतृत्व करण्याची अपेक्षा असताना तीन संघटनांनी वेगवेगळे आंदोलन जाहीर के ले आहे. यामुळे नाभिक समाजातील सलून व्यावसायिक संभ्रमात पडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन महिन्याच्या लॉकडाऊननंतर आता सरकार टप्प्याटप्प्याने व्यवहार खुले करत आहे. मात्र सलून-पार्लर व्यवसायाला अद्यापही मंजुरी न दिल्याने सलून दुकानदार आणि कारागिरांमध्ये काळजीचे वातावरण आहे. या संकटाच्या काळात समाजातील मुख्य संघटनांनी एकत्र येऊन सामूहिक नेतृत्व करण्याची अपेक्षा असताना तीन संघटनांनी वेगवेगळे आंदोलन जाहीर के ले आहे. यामुळे नाभिक समाजातील सलून व्यावसायिक संभ्रमात पडला आहे.
या तीनही मुख्य संघटनांची नावे महाराष्ट्र नाभिक महामंडळ अशीच आहेत. या नामसाधर्म्यामुळे आधीच समाज संभ्रमात आहे. एका संघटनेने आंदोलन जाहीर केले की अन्य संघटना त्यातून अंग काढतात. यामुळे समाजबांधव नेहमी गोंधळात असतात. कोरोनासारख्या गंभीर संकटाच्या काळातही असाच प्रकार घडल्याने समाजातील नेत्यांवर नाराजी व्यक्त होत आहे.
रवी बेलपत्रे अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र नाभिक महामंडळ या संघटनेने ६ जूनला माझे दुकान माझी मागणी हे आंदोलन केले. मात्र त्यात अन्य दोन संघटनांचा सहभाग नव्हता. त्यानंतर कल्याण दळे अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र नाभिक महामंडळ संघटनेने ९ जूनला धोपटी व अर्धनग्न आंदोलन जाहीर केले. तर,भगवान बिडवे हे अध्यक्ष असलेल्या राष्ट्रीय नाभिक महासंघाने आणि दत्ता अनारसे अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र नाभिक महासंघाने १० जूनला निषेध आंदोलन जाहीर केले आहे.
या तीनही संघटनांचे नाव एकच असले तरी अध्यक्ष मात्र वेगळे आहेत. कोरोना लॉकडाऊनच्या काळातील मागण्याही जवळपास सारख्याच असल्या तरी आंदोलन मात्र वेगवेगळ्या दिवशी आहेत, यामुळे सलून दुकानदार व कारागीर संभ्रमात आहेत.
कृती समितीचा प्रयोग अधांतरी
या संकटाच्या काळात सलून व्यावसायिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी नाभिक संघर्ष कृती समिती स्थापन करण्याचे प्रयत्न झाले. यासाठी सर्वच संघटनांच्या अध्यक्षांनी सहमती दर्शविली. त्यासाठी एक व्हॉट्सअॅप ग्रुपही स्थापन झाला आहे. मात्र प्रत्यक्षात एकत्र न येता वेगवेगळे आंदोलन जाहीर झाले आहेत. परिणामत: कृती समितीमध्ये सहभागी होण्याच्या तयारीत असलेल्या अनेक लहान संघटनांची प्रचंड गोची झाली. त्यामुळे या लहान संघटनांनीही आता आपले वेगळे आंदोलन जाहीर केले आहे.