नागपूर मनपातील जन्माच्या आकडेवारीत ‘गोलमाल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 11:20 AM2020-02-13T11:20:50+5:302020-02-13T11:31:43+5:30

नागपूर मनपातर्फे २०१५ ते २०१७ या तीन वर्षांतील जन्म नोंदींची दोन्ही माहिती अधिकारात विसंगत माहिती देण्यात आली आहे.

'Confusion' in Nagpur municipal birth data | नागपूर मनपातील जन्माच्या आकडेवारीत ‘गोलमाल’

नागपूर मनपातील जन्माच्या आकडेवारीत ‘गोलमाल’

Next
ठळक मुद्देदोन माहिती अधिकारात विसंगत माहिती प्रशासनाचे ‘मॅजिकल’ गणित, जन्म आकडेवारीत चक्क दाखविली घट

योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत होणाऱ्या जन्मांची नोंद ठेवणे व आवश्यक तेव्हा दाखले उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मनपा प्रशासनाची आहे. मनपाकडून यासंदर्भात पारदर्शक कारभाराचे दावे करण्यात येत असले तरी, जन्म नोंदींसंदर्भातील दोन माहिती अधिकारांनी मनपाची पोलखोल केली आहे. मनपातर्फे २०१५ ते २०१७ या तीन वर्षांतील जन्म नोंदींची दोन्ही माहिती अधिकारात विसंगत माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे दोन्ही आकडेवारींची तुलना केली असता, जुन्या माहितीच्या तुलनेत नव्या आकडेवारीत चक्क संबंधित वर्षांतील जन्मांच्या आकड्यांमध्ये घट दाखविण्यात आली आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी झालेले जन्म घटविण्याचे हे कुठले ‘मॅजिकल’ गणित केले आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपूर महानगरपालिकेकडे माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. २०१५ ते २०१९ या वर्षांत झालेल्या मुला व मुलींच्या जन्मांच्या आकडेवारीसंदर्भात विचारणा केली होती. मनपातर्फे ३ फेब्रुवारी २०२० रोजी अर्जावर उत्तर देण्यात आले. यानुसार २०१५ मध्ये २८ हजार ३९९ मुले व २६ हजार ७५८ मुली, २०१६ मध्ये २८ हजार २० मुले व २६ हजार २४२ मुली तर २०१७ मध्ये २८ हजार ९२४ मुली व २७ हजार १५५ मुलींचा जन्म झाल्याची माहिती मनपाने दिली.
दरम्यान, ‘लोकमत’कडे याच मुद्यांसंदर्भातील माहिती अधिकाराच्या अर्जावर २० फेब्रुवारी २०१८ रोजी मनपाने दिलेली आकडेवारीदेखील आहे. याच्याशी तुलना केली असता मनपाने आकडेवारीत केलेला गोलमाल लक्षात आला. दोन वर्षांपूर्वी प्राप्त झालेल्या या आकडेवारीनुसार नागपुरात २०१५ साली २९ हजार ४१ मुले व २७ हजार ५४१ मुली, २०१६ मध्ये २९ हजार ४४७ मुले व २४ हजार ४०० मुली तर २०१७ मध्ये २९ हजार ३९ मुले व २१ हजार १२२ मुलींचा जन्म झाला. दोन्ही माहिती अधिकारातील आकडेवारीची तपासणी केली असता, नव्या माहितीमध्ये चक्क जुन्या माहितीच्या तुलनेत जन्मांची संख्या कमी दाखविण्यात आली आहे. २०१५ मधील मुलांच्या जन्म आकडेवारीत ६४२, २०१६ मध्ये १,४२७ तर २०१७ मधील आकड्यांत ११५ ची घट दाखविण्यात आली आहे. तर २०१५ मधील मुलींच्या आकड्यांत ७८३ तर २०१६ मधील आकडेवारीत १,१५८ ची घट दाखविण्यात आली आहे.
आकडेवारी घटलीच कशी ?
अनेकदा लोक मुलांच्या जन्माची नोंदणी उशिरा करताना दिसतात. त्यामुळे २०१८ मध्ये प्राप्त झालेल्या आकडेवारीच्या तुलनेत २०२० मध्ये मनपाने दिलेल्या आकड्यात वाढ झाली असती तर ते संयुक्तिक ठरले असते. परंतु चक्क नव्या माहितीमध्ये जुन्या माहितीच्या तुलनेत आकडेवारी घटविण्यात आली आहे. चक्क तीन वर्षांच्या जन्मांच्या नोंदीत इतकी तफावत आणि तीदेखील घट असलेली कशी काय होऊ शकते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: 'Confusion' in Nagpur municipal birth data

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.