‘नवोदय’ प्रवेशपूर्व परीक्षेत सावळागोंधळ : ५६ विद्यार्थी परीक्षेपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 09:36 PM2019-04-06T21:36:00+5:302019-04-06T21:39:59+5:30
जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेशपूर्व परीक्षा शनिवारी (दि. ६) घेण्यात आली. या परीक्षेसाठी देवलापार व रामटेक अशी दोन परीक्षा केंद्र देण्यात आले होते. मात्र, देवलापार परिसरातील काही विद्यार्थ्यांना रामटेक आणि रामटेक परिसरातील विद्यार्थ्यांना देवलापार येथील परीक्षा केंद्र देण्यात आल्याने घोळ झाला. याच घोळामुळे दोन्ही परीक्षा केंद्रांवरील प्रत्येकी २८ विद्यार्थी (एकूण ५६) या परीक्षेपासून वंचित राहिले आहेत.
कैलास निघोट। लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (देवलापार) : जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेशपूर्व परीक्षा शनिवारी (दि. ६) घेण्यात आली. या परीक्षेसाठी देवलापार व रामटेक अशी दोन परीक्षा केंद्र देण्यात आले होते. मात्र, देवलापार परिसरातील काही विद्यार्थ्यांना रामटेक आणि रामटेक परिसरातील विद्यार्थ्यांना देवलापार येथील परीक्षा केंद्र देण्यात आल्याने घोळ झाला. याच घोळामुळे दोन्ही परीक्षा केंद्रांवरील प्रत्येकी २८ विद्यार्थी (एकूण ५६) या परीक्षेपासून वंचित राहिले आहेत.
रामटेक तालुक्यातील एकूण ४९९ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी ‘ऑनलाईन’ अर्ज सादर केले होते. यात देवलापार परिसरातील १४९ आणि रामटेक परिसरातील ३५० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या परीक्षेसाठी दरवर्षी देवलापार येथील स्वामी विवेकानंद विद्यालय आणि रामटेक येथील समर्थ विद्यालय, अशी दोन परीक्षा केंद्रे दिली जातात. देवलापार परिसरातील विद्यार्थी देवलापार येथे आणि रामटेक परिसरातील विद्यार्थी रामटेक येथील परीक्षा केंद्रावर सदर परीक्षा देतात.
पूर्वी या परीक्षेचे अर्ज ‘ऑफलाईन’ पद्धतीने भरले जायचे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र त्यांच्या शाळांमध्ये पाठविण्याची व्यवस्था केली जायची. यावर्षी ‘ऑनलाईन’ पद्धतीने अर्ज भरून घेण्यात आले; शिवाय विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवेशपत्रही संबंधित ‘साईट’वरून ‘डाऊनलोड’ करावे लागले. प्रवेशपत्र ‘डाऊनलोड’ करण्याचे काम आठवडाभरापासून सुरू होते.
यात देवलापार परिसरातील काही विद्यार्थ्यांना रामटेक आणि रामटेक परिसरातील काही विद्यार्थ्यांना देवलापार येथील परीक्षा केंद्र देण्यात आले. विशेष म्हणजे, एकाच शाळेतील दोन विद्यार्थ्यांना रामटेक व देवलापार अशी दोन वेगवेगळी परीक्षा केंद्रे देण्यात आली. केंद्र संचालक म्हणून दीपक गिरधर यांनी रामटेक व वासुदेव निघोट यांनी देवलापार परीक्षा केंद्रावर जबाबदारी सांभाळली.
शाळा एक अन् परीक्षा केंद्र दोन
अनेकांनी उशिरा प्रवेशपत्र ‘डाऊनलोड’ केल्याने त्यांना परीक्षा केंद्राची माहिती उशिरा मिळाली. परीक्षा केंद्रात बदल करण्यात आल्याने देवलापार परिसरातील विद्यार्थ्यांना रामटेक येथे जाण्यासाठी आणि रामटेक परिसरातील विद्यार्थ्यांना देवलापार येथे येण्यासाठी ४० ते ६० कि.मी.चा प्रवास करावा लागला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कट्टा येथील एका विद्यार्थिनीला देवलापार आणि दुसरीला रामटेक येथील परीक्षा केंद्र देण्यात आले. मात्र, दोघीही देवलापार येथील परीक्षा केंद्रावर पोहोचल्या. यातील अंकिता वरठी हिला तिचे परीक्षा केंद्र रामटेक येथे असल्याचे ऐनवेळी कळले. त्यामुळे तिला वेळेवर रामटेक येथू जाऊन परीक्षा देणे शक्य नसल्याने परीक्षेपासून वंचित राहावे लागले. शिवाय, मौदा तालुक्यातील काही शाळांच्या विद्यार्थ्यांना रामटेक येथे परीक्षा केंद्र दिले होते.