शिवजयंतीच्या तारखेवरून गोंधळ, विधानसभेत गदारोळ, भाजपा-विरोधक आमनेसामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 01:49 AM2017-12-16T01:49:09+5:302017-12-16T01:49:32+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वेगवेगळ्या तारखेऐवजी एकाच तारखेला साजरी करावी, अशी मागणी भाजपा आमदार सुरेश हाळवणकर यांनी करताच विधानसभेत एकच गदारोळ झाला.
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वेगवेगळ्या तारखेऐवजी एकाच तारखेला साजरी करावी, अशी मागणी भाजपा आमदार सुरेश हाळवणकर यांनी करताच विधानसभेत एकच गदारोळ झाला.
राज्य सरकारने शिवजयंतीची १९ फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली आहे. तर शिवसेना तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करीत असते. त्यामुळे वर्षातून दोनदा शिवजयंती साजरी होते. त्यात आ. हाळवणकर यांनी आज तिसरीच तारीख पुढे केली. शिवरायांचा जन्म ८ एप्रिल १६२७ रोजी झाला असून याला काही संशोधकांच्या संशोधनाचा पुरावा आहे. लोकभावनाही तीच आहे, असे सांगत सरकारने यावर तज्ज्ञांची एक समिती नेमून शिवजयंती एकाच दिवशी साजरी करावी, अशी मागणी हाळवणकर यांनी केली.
काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी वेलमध्ये धाव घेत हाळवणकरांची विधाने कामकाजातून काढण्याची मागणी केली. सरकारने १९ फेब्रुवारी ही तारीख निश्चित केलेली असताना; आता नव्याने वाद कशाला, असा संतप्त सवाल त्यांनी केला. त्यावर हाळवणकर यांचे हे वैयक्तिक मत असून सरकारची अधिकृत भूमिका नव्हे, असे सांगत अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हाळवणकर यांची विधाने कामकाजातून काढण्यास नकार दिला. मात्र, अध्यक्षांच्या या निर्णयाने गोंधळात अधिकच भर पडली. शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणेच साजरी व्हायला हवी, अशी आग्रही भूमिका मांडली आणि शिवसेनेच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पाठिंबा दिला.
गदारोळ बघून राष्टÑवादीचे नेते अजित पवार यांनी सर्वांना शांत करत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना राज्य शासनाने शिवरायांच्या जन्मतिथीबाबत इतिहासतज्ज्ञांची समिती नेमलेली होती. पुढे आघाडी सरकार आल्यानंतर या समितीच्या शिफारशीनुसार १९ फेब्रुवारी १६३० ही जन्मतारीख शासनाने निश्चित केलेली आहे. प्रत्येक मुख्यमंत्री १९ फेब्रुवारीला शिवनेरी किल्ल्यावर जाऊन राज्यातील समस्त जनतेच्या वतीने शिवरायांना अभिवादन करीत असतात. यावर कुणाचा आक्षेप असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून भूमिका मांडावी. इथे घोळ निर्माण करू नये, असा सल्ला पवार यांनी दिल्यानंतर कामकाज सुरळीत झाले.