दिशा प्रकरणावरुन गोंधळ, आदित्य ठाकरेंनी सांगितली भावनिक आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 05:13 PM2022-12-22T17:13:18+5:302022-12-22T17:14:49+5:30
"मला या प्रकरणात एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय. जी व्यक्ती आता हयात नाही. त्या व्यक्तीचे आई-वडील टीव्हीसमोर रडले, त्यांचं दुःख त्यांनी व्यक्त केलं
नागपूर - येथील हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी दिशा सालियान प्रकरणावरुन सभागृहात गोंधळ झाला. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी दिशा सालियान प्रकरणावरुन ठाकरेंना लक्ष्य करत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच, याप्रकरणी नव्याने चौकशीची मागणीही केली. त्यानंतर, गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करणार असल्याची घोषणा विधानसभेत केली. त्यामुळे, आता पुन्हा एकदा दिशा सालियान मृत्युप्रकरणाची चौकशी होणार आहे. आमदार नितेश राणेंनी याप्रकरणात आदित्य ठाकरेंच्या नार्को टेस्टचीही मागणी केली आहे. आता, यावरुन आदित्य ठाकरेंनी सरकारवर जोरदार पलटवार केला आहे. तसेच, दिशा सालियान प्रकरणावर भावनिक प्रत्युत्तर दिलं.
"मला या प्रकरणात एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय. जी व्यक्ती आता हयात नाही. त्या व्यक्तीचे आई-वडील टीव्हीसमोर रडले, त्यांचं दुःख त्यांनी व्यक्त केलं. त्यांनी राष्ट्रपतींना सुरु असलेल्या घाणेरड्या राजकारणाबाबत लिहिलेलं आहे. काही आमदारांनी त्यांच्याबाबत वक्तव्य केलं त्यांचीही बदनामी करण्यात आली,'' असे भावनिक प्रत्युत्तर आदित्य यांनी दिले. तसेच, आपलं राजकारण एवढं घाणेरडं कधीच नव्हतं. तिच्या आई-वडिलांनी विनंती करुन देखील, तसेच त्यांनी राष्ट्रपतींकडेही मागणी केली आहे की, आमची होणारी बदनामी थांबली नाहीतर आम्ही जगू शकणार नाही.", अशी आठवणही आदित्य यांनी करुन दिली. तसेच, खोके सरकार ३२ वर्षीय तरुणाला घाबरलं असल्याचंही ते म्हणाले.
माझ्या बदनामीचे प्रयत्न सुरू - आदित्य
"एका 32 वर्षाच्या तरुणाला खोके सरकार घाबरलंय. म्हणूनच बदनामीचे प्रयत्न होत आहेत. जनतेला माहित आहे, आज हे गद्दार मुख्यमंत्री ज्या घोटाळा प्रकरणात अडकले आहेत, ते आम्हाला सभागृहात सादर करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्ताधारी पक्ष हे सतत वेलमध्ये येत आहे आणि अध्यक्ष, तालिका अध्यक्ष आम्हाला बोलू देत नाहीत. त्या बाजूला 14 जणांना बोलू दिलं, तेही एकापाठोपाठ. अडीच वर्षात मी तरी असं हाऊस सुरु असल्याचं पाहिलं नाही. मी लहानपणापासून टीव्हीवर अधिवेशन पाहिलंय. पण सत्ताधारी पक्ष वेलमध्ये येऊ आंदोलन करतोय, असं कधीच दिसलं नाही."
गद्दार मुख्यमंत्र्यांना वाचवण्याचे प्रयत्न
"यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, राज्यपाल हटाओ आम्ही जी सातत्याने मागणी करत आहोत, ज्या महाराष्ट्रद्वेशी राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान केला. महाराष्ट्राच्या विधीमंडळाचा अपमान केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. महात्मा फुलेंचा अपमान केला. त्यांना वाचवण्यासाठी हा पूर्ण प्रयत्न केला जात आहे. घोटाळेबाज, गद्दार मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे जे काही शोधायचंय ते शोधू द्यात. महत्त्वाची गोष्ट एकच आहे की, NIT चा घोटाळा आम्हाला सभागृहात सादर करु न देण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत," असंही आदित्य ठाकरे म्हणाले.