बसस्टँडवर गर्दी; जागेसाठी प्रवासी, फलाटासाठी चालकांची धावपळ!

By नरेश डोंगरे | Published: November 5, 2023 10:15 PM2023-11-05T22:15:31+5:302023-11-05T22:15:38+5:30

गणेशपेठ बसस्थानक : दर ७ मिनिटांत २ बसेस ४०० पेक्षा जास्त एसटींची ये-जा

Congestion at the bus stand at Nagpur Ganesh Peth; Passengers for space, drivers running for the platform! | बसस्टँडवर गर्दी; जागेसाठी प्रवासी, फलाटासाठी चालकांची धावपळ!

बसस्टँडवर गर्दी; जागेसाठी प्रवासी, फलाटासाठी चालकांची धावपळ!

नागपूर : मोजक्या बसेस अन् प्रवाशांची मोठी गर्दी, त्यामुळे येथील मुख्य बसस्थानक भल्या सकाळपासून रात्रीपर्यंत गजबजलेले दिसत आहे. दुसरे म्हणजे, आपल्याला बसमध्ये सिट मिळावी म्हणून प्रवाशी धावपळ करीत आहेत. तर, फलाटांची अपुरी संख्या असल्याने बसचालकांनाही बस लावण्यासाठी प्लॅटफॉर्म शोधावा लागत असल्याचे चित्र गणेशपेठ बसस्थानकावर बघायला मिळत आहे.

दिवाळीचा सण पुढ्यात असल्याने बसस्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झालेली आहे. यात नेहमी जाणे येणे करणाऱ्या प्रवाशांसोबतच दिवाळीच्या खरेदीच्या निमित्ताने नागपुरात येणाऱ्या आणि येथून परत आपापल्या गावी जाणाऱ्या प्रवाशांचा समावेश आहे. बसमध्ये जागा (सिट) मिळावी म्हणून प्रवाशी जिवाचा आटापिटा करताना दिसतात. कुणी बसच्या खिडकीला लोंबकळून आतमध्ये रुमाल, टोपी, दुपट्टा फेकतात तर कुणी पिशवी, बॅग ठेवून सिट आरक्षित करतात. फलाटावर बस लागण्यापूर्वीच बसमध्ये चढण्यासाठीही अनेक प्रवासी चढाओढ करताना दिसून येतात. प्रवाशांची अशी कसरत सुरू असतानाच येथे बस लावण्यास जागा मिळावी म्हणून बसचालकांचाही गोंधळ उडालेला बघायला मिळते.

नागपूरच्या मुख्य बसस्थानकावर रोज ४०० पेक्षा जास्त बसेसची ये-जा असते. अर्थात दर सात मिनिटांत येथे दोन बसेस येतात. मात्र, येथे केवळ २० प्लेटफॉर्म आहेत. येणाऱ्या बसची येथे थांबण्याची वेळ किमान १० ते १५ मिनिटे असते. त्यामुळे स्थानकात अनेक बसेसला फलाटच उपलब्ध नसतात. परिणामी बसचालकाला मिळेल त्या जागेवर बस उभी करावी लागते. अशात एकाच वेळी चार ते पाच बसेस स्थानकावर आल्यास खाली असलेल्या फलाटावर आपली बस उभी करण्यासाठी बसचालक कसरत करताना दिसून येतात. 

कधी होणार फलाटांचे काम
गणेशपेठ बसस्थानकांवर येणाऱ्या - जाणाऱ्या बसेसची संख्या लक्षात घेता येथे नवीन २१ फलाटं तयार करण्याच्या कामाला तीन वर्षांपूर्वी मंजूरी मिळाली होती. त्याची रितसर प्रक्रिया पार पाडल्यानंतर एका कंत्राटदाराला कामही देण्यात आले. त्याने काम सुरू करून रक्कम उचलली आणि नंतर मात्र काम अर्धवट सोडून दिले. हे अर्धवट काम सुरू करण्यात काय अडचण आहे, ते कधी पूर्ण होणार, असा प्रश्न आहे.
 

Web Title: Congestion at the bus stand at Nagpur Ganesh Peth; Passengers for space, drivers running for the platform!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.