राज्यातील सत्तांतरामुळे जि.प.मध्ये काँग्रेस सक्रिय; सदस्यांची नाराजी दूर करण्यासाठी ‘वन टू वन’ चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2022 01:27 PM2022-07-08T13:27:13+5:302022-07-08T13:27:26+5:30
काँग्रेसमधील नाराज सदस्यांना एकत्रित करून राष्ट्रवादीच्या मदतीने सत्तांतराची शक्यता पडताळली जात आहे. याचाही बैठकीत कानोसा घेण्यात आला.
नागपूर : राज्यातील सत्तांतराचे पडसाद जिल्हा परिषदेच्या राजकारणावर पडू नये, यासाठी काँग्रेस अॅक्शन मोडमध्ये आली आहे. सदस्यांची नाराजी दूर करण्यासाठी व प्रत्येक सदस्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ‘वन टू वन’ चर्चा करण्यात आली. यासाठी विशेष आढावा बैठक घेण्यात आली.
अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतीची लवकरच निवड केली जाणार आहे. राज्यातील सत्तांतरानंतर भाजप-शिंदे गटाची सत्ता आली. यामुळे जिल्हा परिषदेतील भाजप सदस्य सक्रिय झाले आहे. काँग्रेसमधील नाराज सदस्यांना एकत्रित करून राष्ट्रवादीच्या मदतीने सत्तांतराची शक्यता पडताळली जात आहे. याचाही बैठकीत कानोसा घेण्यात आला.
जिल्हा परिषदेत काॅंग्रेसची सत्ता असून सुनील केदार गटाचे वर्चस्व आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी काॅंग्रेसमधील काही सदस्य आग्रही आहे. नाना कंभाले यांनी तर उघडपणे अध्यक्ष पदाचे दावेदार असल्याचे स्पष्ट म्हटले आहे. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या अन्य सदस्यांच्या मदतीने अर्ज दाखल केल्यास काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांपुढे अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्यामुळेच सुनील केदार यांनी सर्व सदस्यांना बोलावून विकास कामासोबतच नाराजीचा कानोसा घेतला. सदस्यांच्या सर्कलमध्ये झालेली कामे, निधीचा त्रास, येत असलेल्या अडचणीची इत्तंभूत माहिती घेतल्याचे समजते. अध्यक्ष व उपाध्यक्षसह सभापतींच्या कामाबाबतही त्यांनी माहिती जाणून घेतली. काही पदाधिकाऱ्यांच्या कामाबाबत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र आता त्यांचा कार्यकाळ संपत आला आहे.
सदस्यांची कामे मार्गी लागणार
आढावा बैठकीमुळे जिल्हा परिषद सदस्यांच्या सर्कलमधील प्रलंबित विकास कामे मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे. निधी वाटपात भेदभाव होणार नाही, अशी ग्वाही बैठकीत देण्यात आल्याची माहिती सदस्यांनी दिली.