काँग्रेस अन् उबाठा गटात रस्सीखेच: रामटेकसाठी पदाधिकाऱ्यांचे उद्धव ठाकरे यांना साकडे
By कमलेश वानखेडे | Published: March 14, 2024 07:19 PM2024-03-14T19:19:23+5:302024-03-14T19:20:04+5:30
ठाकरेंनी दिली महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चेची सूचना
कमलेश वानखेडे, नागपूर: रामटेक लोकसभेच्या जागेवर गेल्या दोन निवडणुकीत शिवसेनेचा खासदार विजयी झाला आहे. यावेळी ही जागा आपण नक्कीच जिंकु, असा विश्वास व्यक्त करीत ही जागा काँग्रेसला न सोडता शिवसेना (उबाठा) ने च लढवावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. यावर ठाकरे यांनी नागपूर जिल्ह्यातील स्थानिक महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याचा सल्ला पदाधिकाऱ्यांना दिला.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वाशिम जिल्ह्यातील कारंडा (लाड ) येथे बुधवारी सभेसाठी आले होते. त्यावेळी शिवसेना (उबाठा) चे पदाधिकारी माजी खा. प्रकाश जाधव, सुरेश साखरे, जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले, उत्तम कापसे, हर्षल काकडे, राजू हरणे, राध्येश्याम हटवार, अशोक डोंगरे, प्रेम रोडेकर, संदीप निंबार्ते, दीपक मुळे, विशाल बरबटे आदींनी ठाकरे यांची भेट घेतली.
यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी रामटेक जागा पक्षानेच लढण्याचा आग्रह केला. सोबतच आपण द्याल तो उमेदवार मान्य करू, अशी भूमिकाही पदाधिकाऱ्यांनी मांडली. यावर ठाकरे यांनी आपण अद्याप रामटेकची जागा सोडलेली नाही व सोडणारही नाही, असे सांगितल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला आहे. सोबतच जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांना रामटेकची जागा लढविण्यासाठी समर्थन मागा, अशी सूचनाही ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केली. या सूचनेनुसार पदाधिकारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत.