४९ नेत्यांच्या समितीची शाळा; पण काँग्रेसचा 'शिक्षक' उमेदवार मिळेना!
By कमलेश वानखेडे | Published: October 13, 2022 12:58 PM2022-10-13T12:58:50+5:302022-10-13T12:59:17+5:30
शिक्षक भारती म्हणते शब्द पाळा : विमाशीलाही समर्थनाची आस
नागपूर :नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिक्षक संघटनांनी आपले उमेदवार जाहीर केले असताना काँग्रेसने मात्र अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. पक्षाचा उमेदवार लढवायचा की कुणाला समर्थन द्यायचे याबाबत काँग्रेसमध्ये पुरता गोंधळ सुरू आहे. या निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसने तब्बल ४९ नेत्यांची समिती नेमली आहे. मात्र, उमेदवारावर चर्चा करण्यासाठी अधिकृतपणे एक बैठकही घेतलेली नाही.
गेल्या निवडणुकीत भाजप समर्थित शिक्षक परिषदेचे आ. नागो गाणार यांचा निसटता विजय झाला होता. शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांनी तगडी टक्कर दिली होती. तर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे आनंदराव कारेमोरे होते. काँग्रेसकडून लढलेले शाळा संचालक महामंडळाचे विदर्भाचे अध्यक्ष भद्रावतीचे अनिल शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसकडून रिंगणात उतरलेले राष्ट्रवादी शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष खेमराज कोंडे यांना दखलपात्र मतेही मिळविता आली नव्हती. आता शिक्षक परिषदेने पुन्हा एकदा आ. नागो गाणार यांची उमेदवारी जाहीर केली आहे. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाकडूून चंद्रपूरचे सुधाकर अडबाले रिंगणात उतरले आहेत.
मागील निवडणूक वगळता काँग्रेसने प्रत्येकवेळी विमाशीला साथ दिली. त्यामुळे यावेळीही तीच जुनी आघाडी कायम ठेवावी, अशी साद विमाशीच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला घातली आहे. पदवीधर निवडणुकीच्या वेळी शब्द देऊनही अद्याप काँग्रेसने समर्थन जाहीर न केल्यामुळे शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांनी आपली उमेदवारी जाहीर करीत प्रचार सुरू केला आहे. भाजपला खरेच रोखायचे असेल तर काँग्रेसने दिलेला शब्द पाळावा, अशी शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांची मागणी आहे.
शिक्षक भारतीचे पटोलेंना पत्र
- नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षक भारतीने आपला उमेदवार न देता काँग्रेसला पाठिंबा द्यावा व त्या बदल्यात शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस आपला उमेदवार न देता शिक्षक भारतीला पाठिंबा देईल, असा तह काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत झाला होता. याचे स्मरण करून देणारे पत्र शिक्षक भारतीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिले आहे. पदाधिकाऱ्यांनी पटोले यांची दोनदा प्रत्यक्ष भेटही घेतली. मात्र, काँग्रेस नेते अजूनही समर्थनाबाबत भूमिका जाहीर करणे टाळत आहेत.
अशी आहे काँग्रेसची समन्वय समिती
- शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रेसने नेमलेल्या ४९ सदस्यीय केंद्रीय समन्वय समितीचे बबनराव तायवाडे हे या समितीचे मुख्य समन्वयक आहेत. या समितीमध्ये माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, सुनील केदार, रणजित कांबळे, राजेंद्र मुळक अशा सात माजी मंत्र्यांचा समावेश आहे. पक्षाचे खासदार बाळू धानोरकर यांच्यासह आमदार सुभाष धोटे, विकास ठाकरे, अभिजित वंजारी, राजू पारवे, प्रतिभा धानोरकर, सहस्रम करोटे या आमदारांचाही समावेश आहे. प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, चारुलता टोक, किशोर गजभिये यांच्यासह प्रदेश पदाधिकाऱ्यांचा समावेश करीत जबाबदारी सोपविण्यात आली आहे.