काँग्रेसचे ‘ए-बी’ फॉर्म कोरे की छापील ?
By admin | Published: January 25, 2017 08:36 PM2017-01-25T20:36:18+5:302017-01-25T20:36:18+5:30
महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे होणा-या ‘ए-बी’ फॉर्म वितरणात बरेच घोटाळे झाल्याचा इतिहास आहे. उमेदवारांचे ‘ए-बी’ फॉर्म पळविण्यासाठी ते एकाच जागेसाठी दोन
Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 25 - महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे होणा-या ‘ए-बी’ फॉर्म वितरणात बरेच घोटाळे झाल्याचा इतिहास आहे. उमेदवारांचे ‘ए-बी’ फॉर्म पळविण्यासाठी ते एकाच जागेसाठी दोन उमेदवारांना फॉर्म देण्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे यावेळी प्रदेश काँग्रेसकडून उमेदवारांचे नाव छापलेले ‘ए-बी’ फॉर्म येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर ऐनवेळी एखाद्या उमेदवाराने लढण्यास असमर्थता व्यक्त केली तर पर्यायी उमेदवाराला दुसरा ‘ए-बी’ फॉर्म कुठून द्यायचा, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. इच्छुक उमेदवारांनी मात्र आतापासूनच ‘ए-बी’ फॉर्मचे टेन्शन घेतले आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच काँग्रेसतर्फे उमेदवारांना ‘ए-बी’ फॉर्म देण्यात आल्याचा इतिहास आहे. २०१२ मध्ये काँग्रेसने मुदतीच्या दोन दिवसांपूर्वी ८० उउमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. मात्र, दुसºयाच दिवशी या यादीतील २२ उमेदवारांचे तिकीट कापण्यात आले होते. त्यावेळी प्रदेश काँग्रेसकडून कोरे ‘ए-बी’ फॉर्म आल्यामुळे बदललेल्या उमेदवारांना ते देणे शक्य झाले होते. या वेळीही तसा प्रकार घडू नये, ऐनवेळी कुणाची नावे कापून मर्जीतील उमेदवारांना फॉर्म दिले जावू नये म्हणून उमेदवाराचे नाव छापलेलेच ‘ए-बी’ फॉर्म प्रदेश काँग्रेसकडून देण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दुसरीकडे असे केल्याने काय धोका होऊ शकतो, ते ही भक्कमपणे मांडले जात आहे. उमेदवाराचे नाव छापलेले ‘ए-बी’ फॉर्म प्रदेश काँग्रेसकडून देण्यात आले व वेळेवर एखाद्या उमेदवाराने निवडणूक लढण्यास असमर्थता व्यक्त केली तर ऐनवेळी दुस-या उमेदवाराला देण्यासाठी ‘ए-बी’ फॉर्म उपलब्ध राहणार नाही. खोडतोड करून दुसरे नाव लिहिलेला ‘ए-बी’ फॉर्म स्वीकारला जात नाही. अशा परिस्थितीत संबंधित जागेवर काँग्रेसचा अधिकृत उमेदवार न राहण्याचा धोका आहे. त्यामुळे प्रदेश काँग्रेसतर्फे कोरेच ‘ए-बी’ फॉर्म येतील, असा दावा काँग्रेसच्या काही नेत्यांनी केला आहे. त्यामुळे या वेळी काँग्रेसचे ‘ए-बी’ फॉर्म वितरणात होणा-या घोळाच्या इतिहासाची पुनरावृत्ती होते की सर्वकाही सुरळित पार पडते याकडे काँग्रेस जणांच्या नजरा लागल्या आहेत.