वनवे गटावर कारवाईसाठी काँग्रेस ‘बॅकफूट’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:58 AM2017-08-28T00:58:35+5:302017-08-28T00:59:10+5:30

गटनेता निवडण्यात पक्षविरोधी भूमिका घेतल्यावरून महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्यासह १६ नगरसेवकांना प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार शहर काँग्रेसने कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या.

Congress 'backfoot' to take action on the Oneway Group | वनवे गटावर कारवाईसाठी काँग्रेस ‘बॅकफूट’वर

वनवे गटावर कारवाईसाठी काँग्रेस ‘बॅकफूट’वर

Next
ठळक मुद्देनोटिसीला उत्तर न देऊनही शांत : न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गटनेता निवडण्यात पक्षविरोधी भूमिका घेतल्यावरून महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्यासह १६ नगरसेवकांना प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार शहर काँग्रेसने कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या. मात्र, एकाही नगरसेवकाने मुदतीत स्पष्टीकरण सादर केले नाही. या घटनाक्रमाला सुमारे चार आठवडे होत आले तरी प्रदेश किंवा शहर काँग्रेसने अद्याप संबंधितांविरुद्ध कारवाईसाठी पावले उचललेली नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी काँग्रेस ‘बॅकफूट’वर आली असून ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ ची भूमिका घेतली आहे. न्यायालयात प्रलंबित प्रकरणाचा निकाल लागल्यानंतरच हालचाली होण्याची शक्यता आहे.
प्रदेश काँग्रेसने पाठविलेल्या निरीक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत माजी मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या गटाचे संजय महाकाळकर यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. मात्र, या निवडीवर नाराजी व्यक्त करीत काँग्रेसच्या १६ नगरसेवकांनी एकत्र येत तानाजी वनवे यांची गटनेतेपदी निवड केली होती. विभागीय आयुक्तांकडे तसा अर्ज देऊन महापालिका आयुक्तांसमक्ष आपले बहुमतही सिद्ध केले होते. त्यामुळे आयुक्तांनी वनवे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात येत असल्याचे जाहीर केले. या निर्णयाला महाकाळकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. प्रदेश काँग्रेसनेही न्यायालयीन प्रकरणात अभिजित वंजारी यांना प्रतिनिधी नेमून महाकाळकर यांची नियुक्ती योग्य असल्याचा दावा केला. उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून निकालाची प्रतीक्षा आहे. या निकालाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत प्रदेश काँग्रेसच्या निर्देशावरून शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी वनवे गटाच्या १६ नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र दिलेल्या आठ दिवसाच्या मुदतीत एकाही नगरसेवकाने स्पष्टीकरण दिले नाही. वनवे यांच्यासह नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी आपल्याला पक्षाकडून अशी कुठलीही नोटीस मिळाली नसल्याचा दावा केला आहे तर हर्षलता साबळे यांनी मात्र नोटीस मिळाल्याची कबुली देत दोन- तीन दिवसात स्पष्टीकरण देणार असल्याचे सांगितले.
मात्र, मुदतीनंतरही कुणी स्पष्टीकरण दिले नाही. नोटीस जारी झाल्यानंतर माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या बंगल्यावर माजी मंत्री नितीन राऊत यांच्या उपस्थितीत संबंधित नगरसेवकांची बैठक झाली होती. तीत नेत्यांकडून नगरसेवकांना आपण पाठीशी असल्याचा धीर देण्यात आला होता. त्यामुळे संबंधित १६ नगरसेवक कोणत्याही परिस्थितीत माघार घेण्याच्या मनस्थितीत नाही. आपण काहीच नियमबाह्य किंवा पक्षविरोधी केले नाही, असा त्यांचा दावा आहे.
लेखाजोखा प्रदेशकडे सादर
नोटिसीला एकाही नगरसेवकाने उत्तर दिले नाही याची माहिती शहर काँग्रेसतर्फे प्रदेश काँग्रेसला कळविण्यात आली आहे. त्याचा एक सविस्तर अहवालही तयार करण्यात आला आहे. पुढे काय भूमिका घ्यायची यासाठी प्रदेश काँग्रेसच्या निर्देशांची शहर काँग्रेसला प्रतीक्षा आहे.
शहर काँग्रेसकडूनही कारवाई नाही
प्रदेश काँग्रेसने नगरसेवकांवर कारवाई करून अहवाल सादर करण्याचे अधिकार शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांना दिले होते. त्यानुसार ठाकरे यांनी नोटीस बजावली. मात्र, नोटिसीला उत्तर न दिल्यानंतर शहर काँग्रेसकडून कुठलीही कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही. संबंधितांना पुन्हा दुसरी शॉर्ट पिरेड नोटीस देण्याचा विचार समोर आला होता. मात्र, तसेही झाले नाही. शहर काँग्रेसने कारवाईसाठी पावले न उचलल्यामुळे वनवे गटाचे मनोबल उंचावले आहे.

Web Title: Congress 'backfoot' to take action on the Oneway Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.