गडकरींच्या घरासमोर ‘पॉलिटिकल’ राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2022 08:45 PM2022-02-10T20:45:40+5:302022-02-10T21:04:36+5:30

Nagpur News कोरोना प्रादुर्भावासाठी महाराष्ट्र राज्य जबाबदार असल्याचे वक्तव्य करणाऱ्या पंतप्रधान मोदींविरोधात काँग्रेसने गुरुवारी आंदोलनाची तयारी केली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानासमोर कॉंग्रेसचे कार्यकर्ते येण्याअगोदरच शेकडो भाजपचे कार्यकर्ते पोहोचले.

Congress-BJP workers face each other in front of Gadkari's house | गडकरींच्या घरासमोर ‘पॉलिटिकल’ राडा

गडकरींच्या घरासमोर ‘पॉलिटिकल’ राडा

Next
ठळक मुद्देदोन्ही पक्षांच्या आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

नागपूर : कोरोना प्रादुर्भावासाठी महाराष्ट्र राज्य जबाबदार असल्याचे वक्तव्य करणाऱ्या पंतप्रधान मोदींविरोधात काँग्रेसने गुरुवारी आंदोलनाची तयारी केली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानासमोर या आंदोलनासाठी कॉंग्रेसचे कार्यकर्ते येण्याअगोदरच शेकडो भाजपचे कार्यकर्ते पोहोचले. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यावरच तणाव निवळला.

राज्यभरात कॉंग्रेस पंतप्रधान मोदींविरोधात आक्रमक झाली आहे. दुपारी १२ वाजता नितीन गडकरी यांच्या निवासस्थानासमोर कॉंग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार होते. ही बाब कळताच भाजपचे शेकडो कार्यकर्ते सकाळी ११ वाजताच तेथे पोहोचले व कॉंग्रेस नेत्यांविरोधात घोषणाबाजी सुरू केली. नियोजित वेळेत कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्तेदेखील पोहोचले. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे आ. अभिजित वंजारी, अतुल कोटेचा यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी नारेबाजी सुरू केल्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी आक्रमक झाले व त्यांनी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडे मोर्चा वळविला. पोलिसांनी तातडीने बॅरिकेड्स लावत त्यांना रोखले. दुसरीकडे, कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनादेखील दुसऱ्या बाजूला बॅरिकेड्सच्या आतच निदर्शने करण्यास सांगण्यात आले. दोन्ही पक्षांकडून नारेबाजी वाढल्यानंतर अखेर विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. भाजपकडून आमदार कृष्णा खोपडे, आ. मोहन मते, भाजयुमो शहराध्यक्ष पारेंद्र पटले, अविनाश ठाकरे, अर्चना डेहनकर, नीता ठाकरे, चंदन गोस्वामी, सुनील मित्रा, इत्यादी पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.

सामान्य जनतेला फटका

आश्चर्याची बाब म्हणजे ज्या गडकरींच्या घरासमोर आंदोलन झाले, तेच नागपुरात नव्हते. मात्र तणावामुळे नरेंद्रनगर पुलाकडून वर्धा मार्गावर येणारी सगळी वाहतूक बंद करण्यात आली होती. यामुळे सर्वसामान्य जनतेला वळसा घालून जावे लागले. भर दुपारी झालेल्या या आंदोलनाबाबत सामान्य नागरिकांमध्ये नाराजीचा सूर होता.

निवडणुकांचा दिसला ज्वर

दरम्यान, या आंदोलनामध्ये दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये महापालिका निवडणुकांचा ज्वरच दिसून आला. नेत्यांच्या पुढे-पुढे येऊन घोषणा देणे तसेच कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी अनेकांची धडपड सुरू होती. यात आजी-माजी नगरसेवक व तिकिटासाठी इच्छुकांचा समावेश होता.

पोलिसांची सावध भूमिका

कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस दलाकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उपायुक्त लोहित मतानी यांनी कार्यकर्ते आक्रमक झाल्यावर तातडीने सर्वांना बॅरिकेड्सच्या आतच ठेवण्यासाठी निर्देश दिले व त्यामुळे पुढील तणाव टळला.

Web Title: Congress-BJP workers face each other in front of Gadkari's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.