काँग्रेसचा दावा २८० ची मॅजिक फिगर गाठू, भाजप म्हणते अबकी बार ४०० पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2021 07:00 AM2021-12-11T07:00:00+5:302021-12-11T07:00:11+5:30

Nagpur News विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी शुक्रवारी मतदान आटोपले. ५५९ पैकी ५५४ मतदान झाले. जिंकण्यासाठी २७८ मते हवी आहेत. संपूर्ण लढतीत सुरुवातीपासून भाजपचे पारडे जड दिसत होते.

Congress claims to reach magic figure of 280, BJP says this time cross 400 | काँग्रेसचा दावा २८० ची मॅजिक फिगर गाठू, भाजप म्हणते अबकी बार ४०० पार

काँग्रेसचा दावा २८० ची मॅजिक फिगर गाठू, भाजप म्हणते अबकी बार ४०० पार

Next
ठळक मुद्देभाजपचे ग्रामीणमधील ४२ मतदार फुटल्याचा दावा भाजपमध्ये प्रत्येक केंद्रावर काँग्रेसला गळती

 

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी शुक्रवारी मतदान आटोपले. ५५९ पैकी ५५४ मतदान झाले. जिंकण्यासाठी २७८ मते हवी आहेत. संपूर्ण लढतीत सुरुवातीपासून भाजपचे पारडे जड दिसत होते. मतदानानंतर भाजपने ३४८ मते पक्के मिळतील, प्रसंगी ४०० पर्यंत झेप घेऊ, असा दावा केला आहे. काँग्रेस नेतेही मॅजिक फिगर गाठूच असे ठासून सांगत असून, २८० ते २८७ मते घेण्याचा दावा करीत आहेत.

जिल्हा परिषदेत व पंचायत समित्यांचे सभापती असे एकूण ७१ व नगर परिषद आणि नगरपंचायतचे ३३३ मतदार होते. नागपूर महापालिकेत १५५ मतदार होते. यापैकी नागपुरातील ४ मतदारांनी, तर कामठी नगर परिषदेच्या एका मतदाराने मतदान केले नाही. मतदान आटोपल्यानंतर पडद्यामागे घडलेल्या घडामोडींची चर्चा उघड होण्यास सुरुवात झाली आहे. क्रीडामंत्री सुनील केदार यांनी टोकाची भूमिका घेतल्यामुळे ऐनवेळी काँग्रेसला छोटू भोयर यांना बदलून अपक्ष मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर करावा लागला. आता केदार यांनी नागपूर ग्रामीणमधील भाजपची ४२ मते वळविली, असा दावा त्यांचे समर्थक करीत आहेत. काँग्रेसचे एकही मत फुटले नाही. राष्ट्रवादी, शिवसेनेने साथ सोडली नाही, असेही ते ठामपणे सांगत आहेत. भाजपचा अतिआत्मविश्वास तुटलेला दिसला, असे केदार समर्थक आता अतिआत्मविश्वासाने सांगत आहेत.

निवडणुकीनंतर भाजपच्या गोटात उत्साह दिसून आला. गडकरी-फडणवीस हे दोन्ही नेते ताकदीने निवडणुकीत उतरले होते. भाजपचे लोक नाराजी असली तरी बोलून दाखवितात, पक्षाशी गद्दारी करीत नाहीत. त्यामुळे एकही मत फुटू शकत नाही, असा दावा भाजप नेत्यांनी केला. उलट, काँग्रेसला प्रत्येक मतदान केंद्रावर गळती लागली. राष्ट्रवादी व शिवसेनेने आघाडी धर्म किती पाळला हे निकालानंतर काँग्रेसला दिसेलच, असे चिमटेही भाजप नेते काढत आहेत. मतदानाच्या पूर्वसंध्येला अधिकृत उमेदवार बदलविणाऱ्या काँग्रेसने विजयाचे स्वप्न पाहू नये, असा सल्लाही भाजप नेत्यांनी दिला आहे.

निकाल फिरविणारे प्रश्न

- नागपूर महापालिकेत भाजप एकसंघ राहिला का?

- काटोलात चरणसिंग ठाकूर गटाच्या नगरसेवकांनी कुणाची साथ दिली?

- पारशिवनीत सेनेने काँग्रेसचा बाण ताणला?

- बसपाच्या ८ मतदारांनी नेमके कुणाला मतदान केले?

- कामठी तहसील मतदान केंद्रावर सर्वाधिक ५५ मतदार होते. कामठी कुणासोबत राहिली?

- राष्ट्रवादीने आघाडी धर्म पाळला का?

अशा घडल्या घडामोडी

- काँग्रेसने पाठिंबा काढून घेतलेले रवींद्र भोयर हे नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात एकटेच पोहोचले.

- अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसने पाठिंबा दिला असला तरी कामठीच्या तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर ते एकटेच मतदानासाठी पोहोचले.

- भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे हे उमेदवार होते; पण मतदार नव्हते. त्यांनी दिवसभर विविध मतदान केंद्रांना भेटी देत समर्थकांकडून आढावा घेतला.

- उमरेडमध्ये भाजपच्या २२ नगरसेवकांनी एकसंध येऊन मतदान केले.

- जिल्ह्यात सर्वांत आधी शंभर टक्के मतदान करण्यात सावनेर आघाडीवर राहिले. येथे सावनेर नगर परिषदेच्या २३, तर खापा नगर परिषदेच्या २० मतदारांनी मतदान केले.

- रामटेकमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत एकही मतदार मतदानासाठी पोहोचला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीत धाकधूक वाढली होती.

फटाके कोराडी-महादुलातच फुटणार

- मंगेश देशमुख हे महादुला नगर पंचायतमध्ये नगरसेवक आहेत.

बावनकुळे यांचे कोराडी येथे वास्तव्य आहे. त्यामुळे कुणीही जिंकले तरी विजयाचे फटाके कोराडी-महादुला परिसरातच फुटणार आहेत.

Web Title: Congress claims to reach magic figure of 280, BJP says this time cross 400

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.