काँग्रेसच्या नगरसेविका गार्गी चोपरा यांचा राजीनामा मागे
By admin | Published: March 9, 2017 02:40 AM2017-03-09T02:40:23+5:302017-03-09T02:40:23+5:30
काँग्रेसच्या नगरसेविका गार्गी चोपरा यांनी आपला राजीनामा आज बुधवारी मागे घेतला.
नागपूर : काँग्रेसच्या नगरसेविका गार्गी चोपरा यांनी आपला राजीनामा आज बुधवारी मागे घेतला. काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीमुळे त्यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा स्पीड पोस्टाने महापालिका आयुक्तांकडे पाठविला होता. मात्र पोस्टाने आलेल्या राजीनाम्याची व्यक्तिश: सुनावणी घेऊ न खातरजमा केल्याश्विाय तो मंजूर होत नाही. त्यामुळे चोपरा यांचा राजीनामा मंजूर झाला नव्हता.
त्यावर सुनावणी ठेवण्यात आली होती. मात्र विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी समजूत घातल्यानंतर चोपरा यांनी आपला राजीनामा मागे घेतला.
पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघातील निवडणूक यावेळी चांगलीच गाजली होती. भाजपाने शक्ती पणाला लावल्यानंरही या प्रभाग क्रमांक १० मधून काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी झालेत. त्यात गार्गी चोपरा सर्वाधिक मतांनी विजयी झाल्या. त्या माजी नगरसेवक डॉ. प्रशांत चोपरा यांच्या पत्नी होत. त्यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात होता.
महापालिका निवडणुकीत दारुण पराभव झाला असताना चोपरा यांनी राजीनामा मागे घेतला नसता तर काँग्रेसर मोठी नामुष्की आली असती. (प्रतिनिधी)