दिल्लीत ‘आप’मुळे काँग्रेसचा पराभव
By admin | Published: April 27, 2017 01:59 AM2017-04-27T01:59:16+5:302017-04-27T01:59:16+5:30
दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे.
दिग्विजय सिंह यांची टीका : ‘इव्हीएम’ऐवजी मतपत्रिकांच्या माध्यमातून निवडणुका घेण्याची मागणी
नागपूर : दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. बुधवारी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी ‘आप’सोबतच ‘इव्हीएम’ प्रणालीवर जोरदार हल्लाबोल केला. ‘आप’मुळेच दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्याचा त्यांनी आरोप केला. सोबतच ‘इव्हीएम’ प्रणालीवरदेखील त्यांनी जोरदार टीका केली.
नागपुरात आले असता दिग्विजय सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना वरील वक्तव्य केले. दिल्ली महानगरपालिका निवडणुकांत ‘आप’मुळे भाजपाला फायदा झाला व काँग्रेसचा पराभव झाला. गोव्यामध्ये ‘आप’चा सफाया झाला. परिणामी काँग्रेस अव्वल स्थानी राहिली. ‘आप’ची स्थापनाच भाजपाला मदत करण्यासाठी झाली आहे, असे सिंह म्हणाले.
निवडणुकांमध्ये ‘इव्हीएम’चा गैरवापर होत असल्याच्या मुद्यावरून राजकारण तापले आहे. यावेळी त्यांनी ‘इव्हीएम’वरदेखील भाष्य केले. ‘इव्हीएम’ला ‘हॅक’ करणे कठीण नाही. विकसित देशांप्रमाणे आपल्या देशातदेखील मतपत्रिकेच्या माध्यमानेच निवडणूक घेतली गेली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.(प्रतिनिधी)
नक्षलग्रस्त भागात आदिवासींना सक्षम करावे
छत्तीसगडमधील सुकमा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडीवर झालेल्या हल्ल्याबाबत त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी अप्रत्यक्षपणे या प्रकाराला तेथील राज्य सरकारला जबाबदार ठरविले. या भागातील तेंदुपत्ता व दारूचे ठेकेदार हे नक्षलवादी व पोलिसांमधील दुवा आहेत. काँग्रेसच्या कार्यकाळात तेथील ठेकेदारी पद्धती बंद झाली होती. मात्र भाजपाने ही पद्धत परत सुरू केली. जोपर्यंत ही प्रणाली सुरू आहे, तोपर्यंत नक्षलवाद संपुष्टात येऊ शकत नाही. नक्षलग्रस्त भागातील आदिवासींना सक्षम करण्याची आवश्यकता आहे. नक्षलवादी व शासनाच्या मध्ये त्यांची कुचंबणा होते, असे दिग्विजय सिंह म्हणाले.