‘मेट्रो’च्या मुख्यालयासमोर काँग्रेसची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:38 AM2018-12-11T00:38:33+5:302018-12-11T00:39:26+5:30
कामगारांचे वेतन रोखल्याप्रकरणी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून ‘मेट्रो’च्या सिव्हिल लाईन्स येथील मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. ‘मेट्रो’तर्फे कुठलेही ठोस कारण न देता कामगारांचे वेतन थांबविले. त्यामुळे कामगारांच्या समर्थनार्थ निदर्शने करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामगारांचे वेतन रोखल्याप्रकरणी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून ‘मेट्रो’च्या सिव्हिल लाईन्स येथील मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. ‘मेट्रो’तर्फे कुठलेही ठोस कारण न देता कामगारांचे वेतन थांबविले. त्यामुळे कामगारांच्या समर्थनार्थ निदर्शने करण्यात आली.
शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या निर्देशानुसार, ब्लॉक अध्यक्ष प्रमोद ठाकूर व असंघटित कामगार काँग्रेसचे शहराध्यक्ष युगल विदावत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. ‘मेट्रो’साठी काम करणाऱ्या एका खासगी कंपनीचे देयक मागील चार महिन्यांपासून थांबविण्यात आले आहे. त्यामुळे कंपनीच्या कर्मचारी व कामगारांनी अगोदर छत्रपती चौकात कंपनीच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यानंतर ‘मेट्रो’च्या मुख्यालयात काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. राजकीय हस्तक्षेपामुळे हा प्रकार होत असून, कामगारांना त्रास देण्याचा प्रकार असल्याचा आरोप काँग्रेसतर्फे लावण्यात आला. ‘मेट्रो’च्या अधिकाऱ्याने एका वृद्ध कामगाराला मारहाण केल्याचादेखील आरोप करण्यात आला. दरम्यान, २४ तासात वेतन अदा केले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रमोद ठाकूर यांनी दिला. यावेळी दुर्गाप्रसाद लाहोरी, गुड्डू नेताम, इम्रान शेख, शाहनवाज इत्यादी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.