नागपुरात ‘वंचित’च्या पाठिंब्यामुळे काँग्रेसला ‘पॉवर’
By कमलेश वानखेडे | Published: March 27, 2024 08:01 PM2024-03-27T20:01:04+5:302024-03-27T20:01:28+5:30
मतांचे विभाजन टळणार : ॲड. आंबेडकरांची भाजप विरोधात खेळी
नागपूर: वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नागपुरात काँग्रेसचे उमेदवार आ. विकास ठाकरे यांना समर्थन जाहीर केले आहे. वंचितच्या या पाठिंब्यामुळे लोकसभेच्या लढाईसाठी काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांना ‘पॉवर’ मिळाली आहे. सोबत आंबेडकरांनी नागपुरात पाठिंबा कसा काय दिला, यावरही चर्चा रंगू लागल्या आहेत.
नागपुरात मागासवर्गीय, बहुजन मतदारांची संख्या मोठी आहे. काँग्रेसला समर्थन दिल्यामुळे आता नागपूरच्या रिंगणात वंचितचा उमेदवार नसेल. यामुळे मागासर्वीय मतांचे विभाजन टळेल व याचा काँग्रेसला फायदा होईल, असा काँग्रेस नेत्यांचा दावा आहे.
२०१९ च्या निवडणुकीत वंचितचे उमेदवार सागर डबरासे यांनी सुमारे २६ हजार मते घेतली होती. वंचितकडे जाणारी मते ही काँग्रेसची मानली जातात. ती थेट काँग्रेस उमेदवाराकडे वळती होईल, सोबत या पाठिंब्यामुळे वातावरण निर्मीती होऊन त्याचा जाणारी मते रोखण्यासाठीही फायदा होईल, असा काँग्रेस नेत्यांचा दावा आहे. २०१९ च्या निवडणुकीत वंचित बहुजन विकास आघाडीने महाराष्ट्रातील सर्वच मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन झाले होते. याचा फटका अनेक काँग्रेसच्या दिग्गज उमेदवारांना बसला होता. वंचित बहुजन आघाडीने या वेळी काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा जाहीर करून थेट भाजपलाच आव्हान दिले आहे.
२५ डिसेंबर २०२३ रोजी आंबेडकर यांनी कस्तुरचंद पार्क येथे स्त्री मुक्ति दिन परिषद घेतली. या परिषदेला लक्षणीय गर्दी झाली होती. त्यांना मिळालेला प्रतिसाद पाहता यावेळी वंचितचा उमेदवार नागपुरात लक्षणीय मते घेईल, असा अंदाज राजकीय तज्ज्ञांनी वर्तविला होता. वंचितच्या पाठिंब्यामुळे नागपुरात काँग्रेस समोरील तो धोका टळला आहे.