गटनेत्यासाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच, आज होणार निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2021 10:37 AM2021-10-27T10:37:27+5:302021-10-27T10:41:21+5:30
ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे काँग्रेस, राकाँ व भाजपच्या गटनेत्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. तिन्ही गटनेता ठरल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे गटाची नोंदणी करण्यात येणार आहे.
नागपूर : उपाध्यक्षाचे नाव जवळपास निश्चित झाले असले तरी काँग्रेसची गटनेता निश्चित करताना डोकेदुखी वाढली आहे.
साधारणत: ज्येष्ठ सदस्यांची गटनेत्यापदी नियुक्ती केली जाते. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या महिलाच असल्याने गटनेताही महिलेची वर्णी लागणार का? हा प्रश्नच आहे. दुसरीकडे पुरुषांमध्ये नाना कंभाले, अरुण हटवार यांना सोडल्यास काँग्रेसचे सर्वच सदस्य पहिल्यांदाच निवडून आले आहेत. काही नवीन सदस्यांनीही गटनेत्यासाठी उत्सुकता दाखविली आहे. त्यातही गटनेता ठरविताना कुठल्या गटाचा निवडावा, हासुद्धा एक पेच आहे.
उपाध्यक्ष व गटनेत्याची निवड करण्याच्या अनुषंगाने २७ ऑक्टोबरला बैठक बोलाविली आहे. बैठकीला पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, आदी पदाधिकारी उपस्थित राहतील. बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरही विचारमंथन करण्यात येईल. तसेच उपाध्यक्षपदाचा उमेदवारही याच बैठकीत ठरविण्यात येईल.
उपाध्यक्षपदासाठी माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्या पत्नी सुमित्रा कुंभारे यांचे नाव जवळपास निश्चित असल्याचे बोलले जात आहे. मात्र गटनेतेपदासाठी काँग्रेसमध्ये नाना कंभाले, अरुण हटवार, प्रकाश खापरे, दुधाराम सव्वालाखे, शांता कुमरे, कुंदा राऊत, अवंतिका लेकुरवाळे यांच्या नावांची चर्चा आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे काँग्रेस, राकाँ व भाजपच्या गटनेत्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. तिन्ही गटनेता ठरल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे गटाची नोंदणी करण्यात येणार आहे.
- भाजपमध्ये कारेमोरेंना संधी?
मार्च महिन्यापासून उपगटनेते व्यंकट कारेमोरे यांनी सभागृहात चांगली कामगिरी बजावली आहे. भाजपच्या १४ सदस्यांमध्ये ते सर्वांत ज्येष्ठ सदस्य आहेत; पण पदासाठी कैलास बरबटे व आतिश उमरे यांचीही चर्चा आहे. या संदर्भात भाजपने सर्व सदस्यांची बैठक बोलावून प्रत्येकाचे मत जाणून घेतले आहे. या बैठकीनंतर भाजपच्या कोअर कमिटीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली आहे. व्यंकट कारेमोरेंनाच गटनेतेपदाची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून कळते. बुधवारीच भाजपचा गटनेता जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.
- राष्ट्रवादीत दिनेश बंग चर्चेत
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गटनेतेपदासाठी दिनेश बंग यांचे नाव चर्चेत आहे. माजी मंत्री अनिल देशमुख सध्या सक्रिय राजकारणापासून दूर असल्यामुळे ही जबाबदारी माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्यावर आली आहे. त्यामुळे राकाँतर्फे गटनेतेपदी दिनेश बंग यांचीच वर्णी लागेल, असे बोलले जात आहे.