जि.प. सदस्याच्या पतीची वर्गणी गाेळा करणाऱ्यास मारहाण; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2022 11:39 AM2022-04-12T11:39:55+5:302022-04-12T11:41:24+5:30
ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील हळदगाव येथे रविवारी घडली.
कुही (नागपूर) : ट्रकचालकांकडून वर्गणी गाेळा करीत असताना जिल्हा परिषद सदस्य सुनीता ठाकरे यांचे पती संजय ठाकरे तिथे आले आणि त्यांनी वर्गणी गाेळा करणाऱ्यांवर ट्रकचालकांकडून वसूल करीत असल्याचा आराेप करीत जातीवाचक शिवीगाळ केली.
त्यातच त्यांनी इतरांना बाेलावून त्यांच्याकरवी वर्गणी गाेळा करणाऱ्याला मारहाण केल्याने प्रकरण पाेलिसांत पाेहाेचले. ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील हळदगाव येथे रविवारी (दि. १०) सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
या संदर्भात शैलेश तुकाराम मोटघरे (३६, रा. हळदगाव, ता. उमरेड) यांनी कुही पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदविली आहे. ते त्यांच्या सहकाऱ्यांसह कार्यक्रमासाठी चांपा-हळदगाव मार्गावर धावणाऱ्या ट्रकचालकांकडून वर्गणी गाेळा करीत हाेते. संजय ठाकरे (रा. पाचगाव, ता. उमरेड) या मार्गावरून जात हाेते. त्यांनी शैलेश व त्यांच्या सहकाऱ्यांवर ट्रकचालकांकडून वसुली करीत असल्याचा आराेप करीत भांडायला सुरुवात केली. त्यांच्या सूचनेवरून त्यांचे दाेन नातेवाईक व सात-आठ जण तिथे आले.
त्या सर्वांनी काठ्यांनी मारहाण करायला सुरुवात केल्याने सहकारी पळून गेले व आपल्याला मारहाण केल्याचेही शैलेश माेटघरे यांनी पाेलीस तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी कुही पाेलिसांनी गुन्हा दखल केला आहे. या घटनेचा तपास ठाणेदार चंद्रकांत मदने करीत आहेत.