काँग्रेस नेते सुनील केदार यांना एक वर्ष कारावासाची शिक्षा, दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 04:57 PM2023-01-13T16:57:38+5:302023-01-13T17:05:01+5:30

नागपूर सत्र न्यायालयाचा निकाल

congress leader Sunil Kedar sentenced to one year of imprisonment in the case of assaulting a government employee | काँग्रेस नेते सुनील केदार यांना एक वर्ष कारावासाची शिक्षा, दंड

काँग्रेस नेते सुनील केदार यांना एक वर्ष कारावासाची शिक्षा, दंड

googlenewsNext

नागपूरसरकारी अधिकाऱ्याला मारहाण व शिवीगाळ करण्याच्या प्रकरणामध्ये शुक्रवारी माजी मंत्री सुनील छत्रपाल केदार यांच्यासह एकूण चार आरोपींना एक वर्ष सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावण्यात आली. तसेच, प्रत्येकी एकूण १४ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश मंगला मोटे यांनी हा निर्णय दिला.

अन्य तीन आरोपींमध्ये मनोहर शंकर कुंभारे, वैभव अरुण घोंगे (दोघेही रा. बोरगाव) व दादाराव लेकराम देशमुख (रा. तेलकामठी) यांचा समावेश आहे. ही घटना २०१६ मधील आहे. त्यावेळी कोराडी-२ ते कोराडी-३ उपकेंद्रांपर्यंत ४०० केव्हीची वीजवाहिनी टाकण्याचे काम सुरू होते. मुंबईतील बजाज इलेक्ट्रिकल कंपनीला या कामाचे कंत्राट देण्यात आले होते. कामावर देखरेख ठेवण्यासाठी महापारेषण कंपनीचे सहायक अभियंता अमोल खुबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. ६ ऑक्टोबर २०१६ रोजी दुपारी २.३० च्या सुमारास खुबाळकर व बजाज कंपनीचे सचिन घाटबांधे, शेतकरी हबीब तेलकाळे यांच्या शेतात सुरू असलेले काम पाहण्यासाठी गेले होते. दरम्यान, सुनील केदार व इतर आरोपी तेथे गेले व या कामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप केला. तसेच, केदार यांनी शिवीगाळ करीत शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान केल्याबद्दल जाब विचारला व खुबाळकर यांच्या गालावर दोन थपडा मारल्या.

कुंभारेनेही त्यांना एक थप्पड मारली. त्यानंतर इतर आरोपींनी घाटबांधे यांना मारहाण केली आणि साहित्य व मशिन परत घेऊन जाण्याची धमकी दिली. खुबाळकर यांच्या तक्रारीवरून केळवद पोलिसांनी आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. याचा तपास तत्कालिन ठाणेदार याेगेश पारधी यांनी केला. न्यायालयात सरकारी वकील ॲड. अजय माहुरकर यांनी विविध ठोस पुराव्यांच्या आधारावर आरोपींविरुद्धचे गुन्हे सिद्ध केले. आरोपींतर्फे ॲड. चंद्रशेखर जलतारे यांनी बाजू मांडली.

आरोपींना अशी झाली शिक्षा

  • भादंवि कलम ३५३ (सरकारी कामात अडथळा निर्माण करणे) व कलम ३३२ (सरकारी नोकराला दुखापत करणे) अंतर्गत प्रत्येकी एक वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास.
  • भादंवि कलम ५०४ (अपमान करणे) व कलम ५०६ (धमकी देणे) अंतर्गत प्रत्येकी सहा महिने कारावास व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावास.

Web Title: congress leader Sunil Kedar sentenced to one year of imprisonment in the case of assaulting a government employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.