काँग्रेस नेत्यांनी गांधींनाही विभागले

By Admin | Published: October 3, 2016 02:52 AM2016-10-03T02:52:15+5:302016-10-03T02:52:15+5:30

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला व काँग्रेसला एकसंघ केले. मात्र, नागपुरातील काँग्रेस नेत्यांनी एकाचवेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी गांधी जयंती साजरी केली.

Congress leaders also divided Gandhi to him | काँग्रेस नेत्यांनी गांधींनाही विभागले

काँग्रेस नेत्यांनी गांधींनाही विभागले

googlenewsNext

गांधी जयंतीचे वेगवेगळे कार्यक्रम : गटबाजीचे दर्शन, कार्यकर्त्यांची परीक्षा
नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला व काँग्रेसला एकसंघ केले. मात्र, नागपुरातील काँग्रेस नेत्यांनी एकाचवेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी गांधी जयंती साजरी केली. आपल्या कार्यक्रमाला कोण कोण येतात, याची जणू परीक्षाच कार्यकर्त्यांना द्यावी लागली. यासर्व प्रकारामुळे पुन्हा एकदा काँग्रेसमधील दुफळीचे दर्शन घडले. देशात, राज्यात नव्हे तर महापालिकेतही काँग्रेस सत्तेत नाही. अशावेळी एकत्र येऊन संघर्ष करण्याची गरज असताना काँग्रेस नेत्यांनी गांधीजींचीच विभागणी केली, हे पक्षासाठी सुचिन्ह नाही, अशी प्रतिक्रिया सामान्य कार्यकर्ते व्यक्त करीत होते. काँग्रेसची शहर कार्यकारिणी जाहीर झाल्यापासून काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. माजी मंत्री राऊत समर्थकांनी विरोधकांना कार्यकारिणीत स्थान दिल्याचा मुद्दा करीत राजीनामा देण्याचा इशारा दिला होता.
तर माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या समर्थकांनीही नाराजी व्यक्त केली होती. ती धुसफूस आता गांधी जयंती वेगळीवेगळी करण्यापर्यंत येऊन पोहचली. जागतिक अहिंसा दिन आयोजन समिती व नागपूर शहर काँग्रेस समितीतर्फे रविवारी सकाळी ९ वाजता व्हेरायटी चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आदरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम झाला. तर त्याच वेळी युवक काँग्रेसच्या बॅनरखाली चितार ओळी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर दुसरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रदेश पालक व विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, आ. सुनील केदार उपस्थित होते. मुत्तेमवार यांच्या कार्यक्रमात काँग्रेसचे नगरसेवक, शहर पदाधिकारी उपस्थित होते. तर दुसऱ्या कार्यक्रमात चतुर्वेदी, राऊत, केदार यांच्या समर्थकांसह प्रदेश पदाधिकारीही उपस्थित होते. विशेष म्हणजे माजी खासदार गेव्ह आवारी यांच्यासारख्या काही ज्येष्ठ नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी गटबाजीला खतपाणी न घालता दोन्ही कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली. निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांमध्ये बिनसले असल्याची चर्चा व चिंता या दोन्ही कार्यक्रमांमध्ये कार्यकर्ते व्यक्त करीत होते.

गांधींनी काँग्रेस व देशाला जोडले : नितीन राऊत
महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बहुजन समाजातील सर्व जातीघटकांना एकत्र आणण्याचे काम केले. त्यामुळे हे आंदोलन संपूर्ण देशवासियांचे आंदोलन झाले. गांधीजींचे काँग्रेस पक्षावर असंख्य उपकार आहेत. नेहरू,गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यासारख्या काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्वामुळे काँग्रेस पक्ष धर्मनिरपेक्षता, राष्ट्रीय एकात्मता ही मुल्य देशात रुजवू शकला आणि सारा देश राष्ट्रीयत्वाच्या एका धाग्यात जोडला. या सर्वांना दिशा देण्याचे काम महात्मा गांधी यांनी केले.

चितार ओळीत गांधींचा जयजयकार
चितार ओळी येथे आयोजित गांधी जयंतीच्या कार्यक्रमात युवक काँग्रेसचे नेते कुणाल राऊत, शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांचा जयजयकार केला. विजय वडेट्टीवार, सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, सुनील केदार यांच्याहस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. या वेळी प्रदेश सचिटणीस प्रफुल्ल गुडधे, शहर निरीक्षक झिया पटेल, रवींद्र दरेकर, कमलेश समर्थ यांच्यासह सुभाष खोडे, राजेश छाबरानी, संजय खुले, नरेंद्र जिचकार, संतोष अग्रवाल, नाना झोड़े, राजेश जरगर, नीरज चौबे, विजय कदम, परमेश्वर राऊत, संजय झाडे, डॉ. रिचा जैन, राजेंद्र नंदनकर आदी उपस्थित होते. या वेळी आ. वडेट्टीवार यांनी गांधीजींच्या विचारावर चालूनच आपण जातीयवादी शक्तींचा सामना करू शकतो, असे सांगितले. चतुर्वेदी यांनी या देशात गोडसेच्या विचारांना स्थान मिळू शकत नाही, असे सांगत युवकांनी अशा शक्तींविरोधात लढण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. या वेळी नेत्यांनी महापालिकेवर काँग्रेसचा तिरंगा फडकविण्याचा संकल्प व्यक्त केला.

युवकांनी काढल्या बाईक रॅली
कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर नागपूर युवक काँग्रेसतर्फे कमाल चौक येथून बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीत धीरड पांडे, विवेक निकोसे, माधुरी सोनटक्के, असद खान, इरशाद शेख यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले. एनएसयुआयचे अध्यक्ष आमीर नुरी यांच्या नेतृत्वात संविधान चौक येथून रॅली काढण्यात आली. यात आशीष मंडपे, अभिषेक सिंग, शुभम पांडे, अंतिक राऊत, नीलेश काळे, प्रतीक कोल्हे आदी सहभागी झाले. या दोन्ही रॅली चितार ओळीत कार्यक्रमस्थळी दाखल झाल्या.
व्हेरायटी चौकात गांधीजींना वंदन
व्हेरायटी चौकात आयोजित कार्यक्रमात महात्मा गांधी यांना आवडणारी गीते व देशभक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी उरी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी माजी खा. गेव्ह आवारी, माजी आ. अशोक धवड, यादवराव देवगडे, बाबुराव तिडके, हरिभाऊ नाईक, उमेश चौबे, लीलाताई चितळे, डॉ. बबनराव तायवाडे, हुकूमचंद आमधरे, अ‍ॅड. अभिजित वंजारी, अतुल कोटेचा, उमाकांत अग्निहोत्री, महिला अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, नगरसेवक प्रशांत धवड, संजय महाकाळकर यांच्यासह शहर काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Congress leaders also divided Gandhi to him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.