काँग्रेस नेत्यांमध्ये दुरावा, कार्यकर्ते अस्वस्थ

By admin | Published: July 10, 2017 01:26 AM2017-07-10T01:26:10+5:302017-07-10T01:26:10+5:30

जिल्ह्यातील काँग्रेसचे राजकारण रणजित देशमुख, सुनील केदार, राजेंद्र मुळक व नाना गावंडे या चार नेत्यांच्या अवतीभोवतीच फिरत आले आहे.

Congress leaders are unhappy, activists uncomfortable | काँग्रेस नेत्यांमध्ये दुरावा, कार्यकर्ते अस्वस्थ

काँग्रेस नेत्यांमध्ये दुरावा, कार्यकर्ते अस्वस्थ

Next

नेते ‘गट’ सांभाळण्यात खूश : मंचावर एकत्र, उतरताच वेगळ्या दिशा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील काँग्रेसचे राजकारण रणजित देशमुख, सुनील केदार, राजेंद्र मुळक व नाना गावंडे या चार नेत्यांच्या अवतीभोवतीच फिरत आले आहे. रणजितबाबूंच्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे व आशिष देशमुखांनी भाजपची वाट धरल्यामुळे देशमुखांचा काँग्रेसमधील जोर कमी झाला आहे. अशा परिस्थितीत उरलेल्या तीन नेत्यांना एकत्र येत भाजपा विरोधात एक मोठी ताकद उभारण्याची संधी आहे. मात्र, हे नेते पक्षाच्या कार्यक्रमात एकमेकांच्या शेजारी बसल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात मनभेदांमुळे यांच्यातील अंतर्गत दुरावा वाढत चालला आहे. यामुळे काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता कमालीचा अस्वस्थ आहे.
भाजपाने लोकसभा, विधानसभा, नगर परिषद व महापालिकेचीही निवडणूक लागोपाठ जिंकली. आता नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक तोंडावर आहे. ही निवडणूकही भाजपाने तेवढीच सिरियसली घेतली नाही. मात्र, राज्यभर काँग्रेसचा पराभव होत असताना जिल्ह्यातील काँग्रेस नेते एकत्र येऊन विजयाची रणनीती आखण्यापेक्षा आपले ‘गट’ सांभाळण्यातच खूश दिसत आहेत. जिल्हाध्यक्ष निवडीच्यावेळी पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली होती. माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचे नाव समोर येताच आ. सुनील केदार यांच्या समर्थकांकडून विरोध झाला होता. केदार गटाने नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांचे नाव समोर केले होते. जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, युवक काँग्रेसच्या माजी अध्यक्ष कुंदा राऊत या देखील इच्छुक होत्या. शेवटी मुळक यांची वर्णी लागली.
मुळक यांच्या पदग्रहण सोहळ्यात केदारांची अनुपस्थिती बरेच काही सांगून गेली होती. जिल्हाध्यक्षपद गेल्यानंतर सुनीता गावंडे यादेखील फारशा सक्रिय दिसत नाहीत. बैठकांना त्या उपस्थित असतात. मात्र, त्यांनी पुढाकार घेऊन एखादे मोठे आंदोलन केल्याचे पहायला मिळाले नाही. ज्येष्ठ नेते नाना गावंडे हे देखील तेव्हापासून कमालीचे शांत आहेत.
माजी केंद्रीय सुबोध मोहिते यांनी शिवसेना सोडून काँग्रेसचा हात धरला होता. पक्षाने त्यांना रामटेक लोकसभा व विधानसभेतही संधी दिली. मात्र, मोहिते विजयी झाले नाही. पक्षांतर्गत गटबाजीच्या राजकारणामुळे आपला पराभव झाला, असे मोहिते उघडपणे सांगत होते. शेवटी मोहिते यांनी दोन महिन्यांपूर्वी काँग्रेस सोडली व शिवसंग्राममध्ये दाखल झाले. काँग्रेसने आपल्याला डम्प करून ठेवले होते, असा घणाघात त्यांनी पक्ष सोडताना केला.
माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे कनिष्ठ पुत्र डॉ. अमोल देशमुख यांनी विधानसभेची गेली निवडणूक रामटेकमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढविली. पराभवानंतर दीड वर्षांनी ते काँग्रेसमध्ये दाखल झाले.
मात्र, त्यांनाही पक्षात अजून ‘फ्री हॅण्ड’ मिळालेला नाही. ज्येष्ठ नेत्यांच्या दडपणाखालीच त्यांना काम करावे लागत आहे. माजी आमदार आनंदराव देशमुख, देवराव रडके हे पक्षाच्या बैठकांना नियमित उपस्थित असतात. मात्र, सक्रिय असलेले नेते या ज्येष्ठ नेत्यांनी दिलेला सल्ला ऐकतातच असे नाही. कुंदा राऊत यांची आंदोलनासाठी धडपड सुरू असते. पण ज्येष्ठ नेत्यांकडून त्यांना पाहिजे तसे पाठबळ मिळताना दिसत नाही.

कार्यकर्त्यांना ‘गटा’च्या दोरीने जखडले
काँग्रेसकडे सुरेश भोयर, चंद्रपाल चौकसे, हुकूमचंद आमधरे, मुजीब पठाण, नाना कंभाले, बाबा आष्टनकर, हर्षवर्धन निकोसे, सुरेश कुमरे, मनोहर कुंभारे, प्रकाश वसू, उपासराव भुते, शांता कुमरे, शिवकुमार यादव, मनोज तितरमारे, अरुण हटवार, कुंदा राऊत, प्रणिता कडू, तक्षशिला वाघधरे अशी जिल्हाभर मोठी टीम आहे. सक्रिय महिला कार्यकर्त्याची कमी नाही. मात्र, ज्येष्ठ नेत्यांनी या टीममधील बहुतांश जणांना ‘गटा’च्या दोरीने बांधून ठेवले आहे. जे मोकळे आहेत त्यांना जवळ घ्यायला, त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवायला कुणी तयार नाही. पक्षनिष्ठेपेक्षा व्यक्तिगत निष्ठा पाहून दुसऱ्या फळीतील नेत्यांना ‘आधार’ दिला जात आहे. यामुळे काँग्रेस बळकट होण्याऐवजी कमजोर होण्याचा धोका वाढला आहे.

शेतकरी आंदोलनातही काँग्रेस नेते मागे

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला होता. हे लोण राज्यभर पसरले असताना नागपूर जिल्ह्यात साधी ठिणगीही पडली नव्हती. सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची आयती संधी काँग्रेसकडे चालून आली होती. मात्र, जिल्हातील काँग्रेस नेत्यांनी एकत्र येत संयुक्तरीत्या एकही मोठे आंदोलन केले नाही. रस्ता रोको केला नाही. नागपूर जिल्ह्यात एकतर संकटग्रस्त शेतकरीच नाहीत किंवा काँग्रेसच उरली नाही, असेच चित्र पहायला मिळाले.

Web Title: Congress leaders are unhappy, activists uncomfortable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.