संघाला नवीन नाही काँग्रेस नेत्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 09:49 AM2018-05-30T09:49:45+5:302018-05-30T09:49:53+5:30

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समापन कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून येणार असल्याने, देशभरातील राजकारण्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Congress leaders often visits RSS HQ | संघाला नवीन नाही काँग्रेस नेत्यांची भेट

संघाला नवीन नाही काँग्रेस नेत्यांची भेट

Next
ठळक मुद्देगांधी, बोस, हुसैन आले होते संघस्थानी नेहरूंनी स्वयंसेवकांना केले होते आमंत्रित

योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समापन कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून येणार असल्याने, देशभरातील राजकारण्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. काँग्रेसच्या मुशीतून घडून भारतीय राजकारणावर आपला प्रभाव पाडणार मुखर्जी संघस्थानी कसे काय येत आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. मात्र संघाने केलेल्या दाव्यांनुसार काँग्रेसशी संबंधित मोठी व्यक्ती प्रथमच संघाच्या कार्यक्रमांत किंवा शिबिरामध्ये येण्याची ही पहिलीच वेळ नाही. अगदी राष्ट्रपिता महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, माजी उपराष्ट्रपती डॉ. झाकीर हुसैन, जयप्रकाश नारायण यांनीदेखील संघस्थळी येऊन भेटी दिल्याचा इतिहास आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
खुद्द संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे एकेकाळी काँग्रेसशी जुळले होते व आंदोलनांमध्ये त्यांचा सहभाग राहिला होता.
संघाची परंपरा लक्षात घेतली तर नेहमीच समाजातील सर्व स्तरांतील गणमान्य व्यक्तींना संघाने आमंत्रित करण्यावर भर दिला. संघाची स्थापना झाल्यानंतर नऊ वर्षांनी म्हणजेच १९३४ साली महात्मा गांधी यांनी वर्धा येथे संघाच्या असलेल्या शिबिराला भेट दिली होती. स्व. जमनालाल बजाज यांच्या उपस्थितीत तेथे त्यांनी डॉ. हेडगेवार यांचीदेखील भेट घेतली होती. विशेष म्हणजे १४ सप्टेंबर १९४७ रोजी महात्मा गांधी यांनी दिल्ली येथे सुमारे ५०० स्वयंसेवकांच्या बैठकीला संबोधितदेखील केले होते व त्यात त्यांनी या भेटीचादेखील उल्लेख केला होता. तत्पूर्वी १९२८ साली देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे ज्येष्ठ बंधू विठ्ठलभाई पटेल यांनी मोहितेवाडा शाखेला भेट दिली होती व संघाची कार्यप्रणाली जाणून घेतली होती. सुभाषचंद्र बोस यांनी २० जून १९४० रोजी डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती व यावेळी त्यांनी संघकार्यदेखील जवळून बघितले होते.

संघात सर्वांचाच आदर : नरेंद्र कुमार
काँग्रेसचे नेते संघाच्या कार्यक्रमांना येणे ही नवीन बाब नाही. संघाच्या कार्यक्रमांमध्ये समाजसेवेत सक्रिय आणि समाजात महत्त्वाचे स्थान असलेल्या व्यक्तींनी अतिथी म्हणून बोलविण्याची परंपरा आहे. संघात सर्वांचाच आदर होतो. यंदा आम्ही डॉ. प्रणव मुखर्जी यांना निमंत्रित केले व त्यांची महानता आहे की त्यांनी त्याचा स्वीकार केला, असे मत अखिल भारतीय सहप्रचारप्रमुख नरेंद्र कुमार यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्यानंतरदेखील काँग्रेस नेते आले संघस्थानी
४स्वातंत्र्यानंतरदेखील काँग्रेसचे अनेक नेते संघस्थानी येऊन गेल्याचे दाखले उपलब्ध आहेत. भारताचे माजी उपराष्ट्रपती डॉ. झाकीर हुसैन, जयप्रकाश नारायण यांनीदेखील संघाच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावली होती. नारायण यांनी तर ३ नोव्हेंबर १९७७ रोजी पाटणा येथे संघाच्या बैठकीला संबोधितदेखील केले होते. १९५९ साली जनरल करिअप्पा हे मंगलोर येथे संघ शाखेच्या उत्सवात सहभागी झाले होते. प्रणव मुखर्जी राष्ट्रपतिपदावर असताना २०१७ साली त्यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना विशेष भोजनासाठी निमंत्रितदेखील केले होते व दोघांमध्ये बराच वेळ चर्चादेखील झाली होती.

नेहरू, शास्त्रींकडून विशेष निमंत्रण
१९६३ मध्ये तर तत्कालीन पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांनी संघ स्वयंसेवकांना प्रजासत्ताक दिनाच्या नवी दिल्ली येथे परेडमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते व तीन हजार स्वयंसेवकांनी संपूर्ण गणवेशात पथसंचलन केले होते. सोबतच १९६५ साली भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना सर्वदलीय बैैठकीसाठी विशेष निमंत्रण दिले होते.

Web Title: Congress leaders often visits RSS HQ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.