विधान परिषदेवर जाण्यासाठी काँग्रेसची दिल्लीत लॉबिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 09:06 PM2018-06-30T21:06:39+5:302018-06-30T21:07:59+5:30
विधान परिषदेवर जाण्यासाठी काँग्रेस नेत्यांमध्ये जोरात रस्सीखेच सुरू झाली असून, नेते लॉबिंगसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांना या वेळी माजी खासदार नाना पटोले व माजी मंत्री नितीन राऊत या विदर्भातील नेत्यांकडूनच आव्हान मिळत आहे. हुकूमचंद आमधरे यांनीही कंबर कसली आहे. राजेंद्र गवई हे ‘दलित कार्ड’ चालविण्याच्या प्रयत्नात आहेत. सूत्रांचा निर्णय घेताना प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचीही भूमिका महत्त्वाची राहणार आहे.विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलै रोजी नागपुरात मतदान होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधान परिषदेवर जाण्यासाठी काँग्रेस नेत्यांमध्ये जोरात रस्सीखेच सुरू झाली असून, नेते लॉबिंगसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांना या वेळी माजी खासदार नाना पटोले व माजी मंत्री नितीन राऊत या विदर्भातील नेत्यांकडूनच आव्हान मिळत आहे. हुकूमचंद आमधरे यांनीही कंबर कसली आहे. राजेंद्र गवई हे ‘दलित कार्ड’ चालविण्याच्या प्रयत्नात आहेत. सूत्रांचा निर्णय घेताना प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचीही भूमिका महत्त्वाची राहणार आहे.विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलै रोजी नागपुरात मतदान होणार आहे.
सध्या या तीन जागांवर काँग्रेसकडून विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, आ. शरद रणपिसे व आ. संजय दत्त हे कार्यरत आहेत. संख्याबळाचा विचार करता आता काँग्रेसच्या दोनच जागा निवडून येऊ शकतात. त्यामुळे किमान एक जागा विदर्भाच्या वाट्याला द्यावी, असा पक्षात सूर आहे. भाजपाचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी खासदार नाना पटोले यांच्या नावाची जोरात चर्चा आहे. पटोले यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर सुरुवातीला त्यांना प्रदेश कार्याध्यक्षपद मिळेल, असे अपेक्षित होते. पण उपाध्यक्षपद देऊन बोळवण करण्यात आली. यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भंडारा-गोंदिया लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडण्यात आली. त्यानंतरही पटोले यांनी शक्ती पणाला लावून राट्रवादीचे मधुकर कुकडे यांना विजयी केले. त्यावेळी पटोले हे आता साकोली विधानसभा मतदारसंघातून लढतील, असे भाकीत करण्यात आले होते. मात्र, आता विधान परिषद मिळवून आगामी निवडणुकीत विदर्भाच्या प्रचाराची धुरा सांभाळण्याचा व विदर्भाचा नेता होण्याचा विचार पटोले यांना सतावू लागल्याची चर्चा आहे. त्यातूनच त्यांनी आपला दावा सादर केल्याचे बोलले जात आहे.
काही नेत्यांनी या पदासाठी दलित कार्ड खेळण्याची तयारी चालविली आहे. माजी मंत्री व अ.भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष नितीन राऊत यांनीही आपला दावा सादर केला आहे. विदर्भातील दलित नेत्याला यानिमित्ताने संधी मिळाली तर त्याचा फायदा आगामी निवडणुकीत होईल, असा दावा त्यांचे समर्थक करीत आहेत. राऊत दिल्लीत डेरेदाखल झाले आहेत. माजी राज्यपाल रा.सू. गवई यांचे पुत्र डॉ. राजेंद्र गवई यांनीदेखील मुंबईपासून ते दिल्लीपर्यंत स्वत:साठी फिल्डिंग लावली आहे. गवई हे सातत्याने काँग्रेससोबत आहेत. महापालिकेच्या निवडणुकांमध्येही गवई यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. आगामी निवडणुकीत दलित मतदारांना एक संदेश देण्यासाठी गवई या नावाचा उपयोग होऊ शकतो, असा युक्तिवाद त्यांचे समर्थक करीत आहेत.
काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व नागपूरचे कार्यकर्ते असलेले हुकूमचंद आमधरे यांनीही परिषदेसाठी दावेदारी केली आहे. आमधरे यांनी शुक्रवारी दिल्ली येथे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली व स्वत:चा दावा करणारे दोन पानांचे निवेदन दिले. आपण पक्षाचे निष्ठावान कार्यकर्तेअसून, गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहोत. तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला या वेळी संधी देऊन एक संदेश द्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.
माणिकरावांच्या विरोधात मोघे, पुरकेंची लॉबिंग
माणिकराव ठाकरे यांना गृहजिल्ह्यातूनच विरोधाला सामोरे जावे लागत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी मंत्री शिवाजीराव मोघे व वसंत पुरके यांनी शुक्रवारी दिल्ली गाठत महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. आम्हाला संधी नको पण माणिकरावांना देऊ नका, असे आर्तव त्यांनी केल्याचे समजते. तसेही विधान परिषदेत भाजपा व शिवसेनेचे संख्याबळ वाढत आहे. त्यामुळे उपसभापतिपद काँग्रेसकडे राहीलच याची हमी नाही. अशा परिस्थितीत उपसभापतिपदाचा आधार घेऊन ठाकरे यांना पुन्हा संधी देण्याऐवजी नव्या दमाच्या नेत्याला संधी देण्याची मागणी पुढे आली आहे.
भाजपात अंतर्गत धुसफूस
काँग्रेसप्रमाणे भाजपात कुणीही उघडपणे दावा केलेला नाही. मात्र, आपल्यालाच संधी मिळावी यासाठी जोरात फिल्डिंग लावली जात आहे. यावरून पक्षांतर्गत धुसफूसही सुरू आहे. भाजपाकडून भंडाऱ्याचे तारिक कुरेशी व गडचिरोलीचे बाबूराव कोहळे यांचे नाव चर्चेत आहे. गेल्या चार वर्षांत विधान परिषदेसाठी भाजपाकडून बऱ्याचदा संदीप जोशी यांचे नाव समोर आले. मात्र, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची वर्णी लागत गेल्याने त्यांचे नाव मागे पडले. जोशी हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील आहेत. त्यामुळे त्यांना तेथेही संघी कमीच आहे. अशात त्यांना विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. माजी महापौर प्रवीण दटके यांचीही चर्चा आहे. हलबाबहुल असलेल्या मध्य नागपुरात दटके १० वर्षांपासून दावा करीत आहेत, मात्र संघी हुकत आहे. त्यांचे पुनर्वसन होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांचेही नाव चर्चेत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करीत आहेत, मात्र त्यांनाही विधानसभेसाठी फारशी संधी नाही.
राष्ट्रवादी व शिवसेनेकडून विदर्भाला संधी कमीच
राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षाकडून विदर्भातील नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षातील वैदर्भीय नेते नाराज आहेत. कार्यक्रम राबवायचे आम्ही निपरिषदेवर पुण्या-मुंबईतील नेत्यांनी ठाण मांडायचे, असे चालत राहिले तर विदर्भात पक्ष कसा वाढणार, असा सवाल या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे.
यांनी केला दावा
काँग्रेस भाजपा
- माणिकराव ठाकरे - संदीप जोशी
- नाना पटोले - प्रवीण दटके
- नितीन राऊत - डॉ. राजीव पोतदार
- राजेंद्र गवई - तारिक कुरेशी
- हुकूमचंद आमधरे - बाबूराव कोहळे