काँग्रेसने लुटले, मोदींनी निराश केले
By admin | Published: January 22, 2017 02:04 AM2017-01-22T02:04:44+5:302017-01-22T02:13:37+5:30
देशातील काळा पैसा असलेल्या व्यक्तींची ‘पोलखोल’ करण्याची संधी संपुआ सरकारकडे होती.
राम जेठमलानी : सगळ्यांची संमती असेल तरच आरक्षण हटवावे
नागपूर : देशातील काळा पैसा असलेल्या व्यक्तींची ‘पोलखोल’ करण्याची संधी संपुआ सरकारकडे होती. मात्र त्यांच्याच नेत्यांनी देशाला लुटले असल्यामुळे त्यांनी त्याकडे हेतुपुरस्सरपणे दुर्लक्ष केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीतरी ठोस पावले उचलतील अशी आशा होती. मात्र त्यांनीदेखील निराशच केले आहे, या शब्दांत ज्येष्ठ वकील व खा.राम जेठमलानी यांनी आजी-माजी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. रायसोनी समूहातर्फे जी.एच.रायसोनी महाविद्यालयात आयोजित चौथ्या राष्ट्रीय विद्यार्थी संसदेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मंचावर ज्येष्ठ पत्रकार वेदप्रताप वैदिक, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती (निवृत्त) विजय डागा व रायसोनी समूहाचे चेअरमन सुनील रायसोनी यावेळी उपस्थित होते. देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य या मुद्यावर यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. २००८ साली स्विस बँकांमध्ये काळा पैसा असणाऱ्या जगातील १४०० लोकांची यादी जर्मनीला मिळाली होती व यात सर्वात जास्त नावे भारतीयांची होती. जर्मनीने संबंधित माहिती भारताला देण्याची तयारी दाखविली होती. मात्र तत्कालीन संपुआ सरकारने त्यात पुढाकार घेतला नाही. विरोधकांनीदेखील यासंदर्भात मौन राखले होते.
जेटली कपटी व मूर्ख मंत्री
यावेळी राम जेठमलानी यांनी वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यावर टीकास्त्र सोडले. मला भाजपातून काढण्यात जेटली यांची मोठी भूमिका होती. मी स्पष्टपणे सत्य बोललो म्हणून मला भाजपातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. सत्तेवर आल्यानंतर काळ्या पैशासंदर्भात जेटली संसदेत जशी उत्तरे देत आहेत, त्यावरुन ते कपटी व मूर्ख असल्याचे माझे मत झाले असल्याचे जेठमलानी म्हणाले.