भाजपच्या कार्यालयासमोर आज काँग्रेसचे आंदोलन

By admin | Published: August 27, 2015 02:49 AM2015-08-27T02:49:22+5:302015-08-27T02:49:22+5:30

राज्यासह देशभरात वाढत असलेली महागाई, आश्वासनांची न केलेली पूर्तता तसेच भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण दिले जात असल्याच्या

Congress movement in front of BJP office today | भाजपच्या कार्यालयासमोर आज काँग्रेसचे आंदोलन

भाजपच्या कार्यालयासमोर आज काँग्रेसचे आंदोलन

Next

नागपूर : राज्यासह देशभरात वाढत असलेली महागाई, आश्वासनांची न केलेली पूर्तता तसेच भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण दिले जात असल्याच्या मुद्यावरून काँग्रेसने नागपुरातही भाजपला घेरण्याची तयारी चालविली आहे. प्रदेश काँग्रेसच्या निर्देशावरून आज, गुरुवारी दुपारी १२ वाजता भाजपच्या टिळक पुतळा, गांधीसागर तलाव येथील कार्यालयासमोर काँग्रेस नेते व कार्यकर्ते ‘पर्दाफाश’ आंदोलन करणार आहेत.
काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात होणाऱ्या या आंदोलनात माजी प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, अनिस अहमद व नितीन राऊत यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते सहभागी होतील. शहर काँग्रेसतर्फे टिळक पुतळासमोर आंदोलन करण्याची परवानगी पोलिसांना मागितली होती. मात्र, तेथे भाजप कार्यालय असल्यामुळे पोलिसांनी परवानगी नाकारून गांधीसागरकडून गणेशपेठ पोलीस ठाण्याकडे जाणाऱ्या चौकात आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, आंदोलन स्थळापासून काही पावलांवरच भाजपचे कार्यालय असल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यालयासमोर जाऊन नारेबाजी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लोकमतशी बोलताना शहर अध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले, केंद्र व राज्यात महागाई वाढली आहे. डाळीचे भाव, कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. क्रूड आॅईलच्या किमती कमी झाल्या पण त्या प्रमाणात पेट्रोलचे दर कमी झालेले नाही. केंद्र व राज्यात भ्रष्टाचारी लोकांना संरक्षण देणे सुरू आहे. जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण झालेली नाही. मोठे व्यापारी व उद्योगपतींसाठी सरकार काम करीत आहे. या सर्व बाबींचा पर्दाफाश करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Congress movement in front of BJP office today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.