खासदार नाना पटोलेंचा राजीनामा काँग्रेसच्या इशाऱ्यावर; भाजपा नेत्यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 09:58 AM2017-12-09T09:58:56+5:302017-12-09T10:00:32+5:30

भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले हे गेल्या काही महिन्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करीत आहेत. काँग्रेसच्या इशाऱ्यावरच नाना पटोले यांनी राजीनामा दिला आहे, असा आरोप करीत भाजपाने पटोले यांच्या राजीनाम्याचे खापर काँग्रेसवर फोडले आहे.

Congress MP Nana Paltola resigns over Congress's warning; The charge of BJP leaders | खासदार नाना पटोलेंचा राजीनामा काँग्रेसच्या इशाऱ्यावर; भाजपा नेत्यांचा आरोप

खासदार नाना पटोलेंचा राजीनामा काँग्रेसच्या इशाऱ्यावर; भाजपा नेत्यांचा आरोप

Next
ठळक मुद्देपक्षाला फरक पडणार नसल्याचा दावास्वागतासाठी पोहचले काँग्रेसजन

आॅनलाईन लोकमत
नागपूर : भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी भाजपा आणि पक्षाच्या शीर्ष नेतृत्वावर केलेले आरोप अत्यंत चुकीचे आहेत. पटोले हे गेल्या काही महिन्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करीत आहेत. गुजरात निवडणुकीत याचा फायदा घेण्यासाठी काँग्रेसने त्यांना जाळ्त ओढण्याचे डावपेच आखले आहेत. काँग्रेसच्या इशाऱ्यावरच नाना पटोले यांनी राजीनामा दिला आहे, असा आरोप करीत भाजपाने पटोले यांच्या राजीनाम्याचे खापर काँग्रेसवर फोडले आहे.
पटोले यांच्या राजीनाम्यानंतर भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व राज्यमंत्री सुधाकर देशमुख यांच्यासह भाजपाचे नागपूर शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे, आ. अनिल सोले, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. डॉ. मिलिंद माने, चंदन गोस्वामी, देवेंद्र दस्तुरे आदींनी शुक्रवारी संयुक्त पत्रकार परिषद घेत नाना पटोले यांच्या भूमिकेवर टीका केली. राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट असून राज्यातील फडणवीस सरकारच्या कामगिरीवर नाना पटोले यांनी टीका केली होती. यावर देशमुख म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारची मदत न घेता राज्यात ३४ हजार कोटींची तरतूद करून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली आहे. यापैकी ४१ लाख शेतकºयांना १९ हजार कोटींचे वितरण झाले असून उर्वरित रक्कम आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. उलट २००८ ला केंद्रातील काँग्रेस सरकारने केलेल्या ७० हजार कोटींच्या कर्जमाफीचा विदर्भातील शेतकऱ्यांना लाभ झाला नसल्याचा दावा त्यांनी केला.
नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदी हे खासदारांचे ऐकत नाही व त्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न ऐकून घेतला नाही असाही आरोप केला होता. यावर देशमुख म्हणाले, भाजपामध्ये अंतर्गत लोकशाही असून नेत्यांना विचार मांडण्यासाठी व्यासपीठ आहे. तेथे पटोले यांनी भूमिका मांडायला हवी होती. उलट या काळात त्यांनी राहुल गांधी, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांचे आरोप आणि राजीनामा म्हणजे काँग्रेसच्या इशाऱ्यावर चाललेले राजकीय डावपेच असल्याचे सिद्ध होते, असेही त्यांनी सांगितले.


पटोलेंना स्थानिक पातळीवर विरोध
गेल्या काही महिन्यांपासून पटोले हे पक्षविरोधी भूमिका घेत असल्याने भंडारा, गोंदियाचे आमदार, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज आहेत. त्यांना कुणाचेही समर्थन नाही. या काळात देशात आणि राज्यात झालेल्या प्रत्येक निवडणुकांमध्ये भाजपाला यश मिळाले असल्याने पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या कामगिरीवर जनता खूश आहे. त्यामुळे पटोले यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाला काहीही फरक पडणार नाही.

नागपुरात रात्री ९ वाजता आगमन
भाजपावर नाराज असलेले नाना पटोले हे खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर शुक्रवारी रात्री विमानाने नागपुरात दाखल झाले. पटोले यांनी भाजपाला रामराम ठोकल्याने सुखावलेल्या काँग्रेसच्या काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी विमानतळावर पोहचून पटोले यांचे स्वागत केले. तर, पक्षाकडून अद्याप कुठलेच दिशानिर्देश न आल्यामुळे काहींनी दूर राहणेच पसंत केले.
पटोले यांचे रात्री ९ वाजता विमानतळावर आगमन होताच त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. भंडारा,गोंदियासह नागपुरातहूनही त्यांचे समर्थक पोहचले होते. विशेष म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष व नगरसेवक बंटी शेळके, नितीन कुंभलकर यांच्यासह राष्ट्रवादीचे गटनेते दुनेश्वर पेठेही पोहचले. त्यांनी पटोले यांचे स्वागत केले. शेळके यांनी वाराणसीहून आणलेले गंगाजल पटोले यांना देत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची विनंती केली. पटोले यांनी ११ डिसेंबर रोजी गुजरात येथे राहुल गांधी यांच्यासोबत प्रचार सभेत सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र काँग्रेसमध्ये प्रवेश घेतील का, हे अद्यापही स्पष्ट केलेले नाही. पटोले यांचा काँग्रेसप्रवेश अधिकृतपणे व्हायचा असल्यामुळे काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वागतासाठी जाणे टाळले. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून कुठलाही संदेश आलेला नाही. अशापरिस्थितीत स्वागतासाठी जाणे योग्य राहील का, असा प्रश्न काही नेत्यांना पडला. पुढे गुंता वाढू नये म्हणून या नेत्यांनी पटोलेंच्या भेटीसाठी जाणे टाळले.
विमानतळावर किसान विकास आघाडीचे प्रशांत पवार, मिलिंद महादेवकर, गणेश साबणे, शेखर शिरभाते, उमेश डांगे, विनोद पडोळे, रवींद इटकेलवार आदींनी पटोलेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करीत स्वागत केले. पटोले आज, शनिवारी दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत. याकडे भाजपासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Congress MP Nana Paltola resigns over Congress's warning; The charge of BJP leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.