काँग्रेस-राष्ट्रवादीचे दिवाळीपूर्वीच भाजपला फटाके! शिंदे गटाचा रामटेकमध्ये झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2022 07:49 PM2022-10-15T19:49:47+5:302022-10-15T19:50:35+5:30
Nagpur News नागपूर जि. प. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये धाकधूक वाढली असतानाच पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने दमदार यश मिळविले आहे.
जितेंद्र ढवळे
नागपूर : जि. प. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये धाकधूक वाढली असतानाच पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने दमदार यश मिळविले आहे. जिल्ह्यातील १३ पैकी ९ पंचायत समित्यांवर काँग्रेसचे, ३ ठिकाणी राष्ट्रवादीचे सभापती विराजमान झाले आहेत. रामटेक पंचायत समितीत शिवसेनेने (शिंदे गट) भाजपाच्या मदतीने काँग्रेसकडून सभापतिपद काबीज केले.
जिल्ह्यातील तेराही पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतींचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे नवीन आरक्षणानुसार शनिवारी निवडणूका घेण्यात आल्या.
नरखेड
८ सदस्यीय नरखेड पंचायत समितीत राष्ट्रवादीचे महेंद्र गजबे अविरोध विजयी झाले. उपसभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या माया मुढोरिया यांनी भाजपाचे स्वप्नील नागापुरे यांचा ६ विरुद्ध २ मतांनी पराभव केला.
काटोल
८ सदस्यीय काटोल पंचायत समितीत राष्ट्रवादीचे संजय डांगोरे विजयी झाले. त्यांनी भाजपाच्या प्रतिभा ठाकरे यांचा ५ विरुद्ध २ मतांनी मतांनी पराभव केला. उपसभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे निशिकांत नागमोते विजयी झाले. त्यांनी भाजपाच्या लता धारपुरे यांचा ५ विरुद्ध २ मतांनी पराभव केला. काटोलमध्ये शेकापने राष्ट्रवादीसोबत आघाडी आघाडी धर्म पाळला. मात्र, काँग्रेसचे अरुण उईके मतदानाला अनुपस्थित राहिले.
कळमेश्वर
कळमेश्वर पंचायत समितीच्या सहाही गणात काँग्रेसचे सदस्य असल्याने येथे सभापती आणि उपसभापती पदाची निवड अविरोध झाली. सभापतिपदी प्रभाकर भोसले तर उपसभापतिपदी श्रावण भिंगारे यांची निवड झाली. भिंगारे आधीच्या टर्ममध्ये सभापती होते.
सावनेर
१२ सदस्यीय सावनेर पंचायत समितीत काँग्रेसकडे पूर्ण बहुमत असल्याने सभापती आणि उपसभापतीची निवडणूक अविरोध झाली. सभापतिपदी सर्वसाधारण संवर्गातून अरुणा शिंदे तर उपसभापतिपदी राहुल तिवारी यांची अविरोध निवड झाली.
पारशिवनी
८ सदस्यीय पारशिवनी पंचायत समितीत काँग्रेसचे ७ तर भाजपाचा एक सदस्य आहे. त्यामुळे येथे काँग्रेसच्या मंगला निंबोने यांची सभापती तर करुणा भोवते यांची उपसभापती अविरोध निवड झाली.
रामटेकमध्ये काँग्रेसला धक्का
रामटेक मतदार संघासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपाने एकत्र येत काँग्रेसला धक्का दिला. येथे शिवसेनेचे संजय नेवारे यांनी काँग्रेसचे रवींद्र कुमरे यांचा ५ विरुद्ध ३ मतांनी पराभव केला. उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजपाचे नरेंद्र बंधाटे यांनी काँग्रेसच्या अस्मिता बिरनवार यांचा ५ विरुद्ध ३ मतांनी पराभव केला. मतदानाच्यावेळी काँग्रेसच्या पिंकी रहाटे अनुपस्थित राहल्याने काँग्रेसची ऐनवेळी कोंडी झाली. रहाटे या काँग्रेसच्या गज्जू यादव यांच्या समर्थक मानल्या जातात. यादव यांचे काँग्रेसने निलंबन मागे घेतले असले तरी ते पक्षात फारसे ॲक्टिव्ह नाहीत. त्यांच्या नाराजीचा काँग्रेसला फटका बसला.
मौद्यात काँग्रेसला ईश्वर चिठ्ठीने तारले
दहा सदस्यीय मौदा पंचायत समिती काँग्रेस विरुद्ध भाजपा-सेना युती असा सामना झाला. सभापतिपदाच्या निवडणुकीत येथे काँग्रेसचे स्वप्नील श्रावणकर आणि शिवसेनेचे ज्ञानेश्वर चवरे यांना प्रत्येकी पाच मते मिळाली. यात ईश्वर चिठ्ठीत श्रावणकर विजयी झाले. उपसभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपाचे खेमराज चापले आणि काँग्रेसचे अनिल बोराडे यांच्यात टाय झाला. यात ईश्वर चिठ्ठीत चापले विजयी झाले.
कामठीत २१ वर्षांनंतर काँग्रेसचा सभापती
८ सदस्यीय कामठी पंचायत समितीत २१ वर्षांनंतर काँग्रेसला सभापतिपद मिळाले आहे. सभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या दिशा चनकापुरे यांनी भाजपाच्या वनिता जिचकार यांचा ५ विरुद्ध ३ मतांनी पराभव केला. उपसभापतिपदी काँग्रेसचे दिलीप वंजारी विजयी झाले. त्यांनी भाजपाच्या पूनम मोहोड यांचा पराभव केला.
नागपूर पंचायत समिती
नागपूर पंचायत समितीच्या सभापतिपदी काँग्रेसच्या रुपाली मनोहर तर उपसभापती अविनाश पारधी विजयी झाले. १२ सदस्यीय पंचायत समितीमध्ये काँग्रेसकडे ७, राष्ट्रवादीकडे १ व भाजपाचे ४ सदस्य आहेत. मनोहर यांनी भाजपाच्या सुनीता बुचुंडे यांचा ८ विरुद्ध ४ मतांनी पराभव केला. उपसभापतिपदासाठी भाजपाकडून वैशाली भोयर यांनी उमेदवारी अर्ज सादर केला होता. विजयानंतर सभापती मनोहर यांचे काँग्रेस नेत्यांनी स्वागत केले. यावेळी माजी मंत्री सुनील केदार, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, जि. प.च्या शिक्षण सभापती भारती पाटील, जि. प. सदस्य कुंदा राऊत उपस्थित होते.
उमरेड
८ सदस्यीय उमरेड पंचायत समितीच्या सभापतिपदी काँग्रेसच्या गीतांजली नागभीडकर यांची अविरोध निवड झाली. मात्र, उपसभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली. या पदासाठी सुरेश लेंडे आणि पुष्कर डांगरे या दोन काँग्रेस सदस्यांमध्ये सामना झाला. यात लेंडे विजयी झाले.
कुही
आठ सदस्यीय कुही पंचायत समितीत काँग्रेसच्या वंदना मोटघरे यांची सभापतिपदी अविरोध निवड झाली. उपसभापतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे देवा गवळी आणि भाजपचे इस्तारी तळेकर यांच्यात टाय झाला. यात ईश्वर चिठ्ठीत भाजपचे इस्तारी तळेकर विजयी झाले.
भिवापूर
सर्वसाधारण महिला प्रवर्गाकरिता राखीव असलेल्या भिवापूर पंचायत समितीच्या सभापतिपदी काँग्रेसच्या माधुरी देशमुख तर उपसभापतिपदी राहुल मसराम यांची अविरोध निवड झाली.